ठिबक सिंचनाचे दोन कोटी अखर्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:53 PM2018-01-29T23:53:58+5:302018-01-29T23:54:14+5:30
आॅनलाईन लोकमत
वर्धा : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची सुविधा झाली असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता अनुदानावर ठिबक सिंचन देण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला. शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचनाची सुविधा उलब्ध असतानाही त्यांच्याकडून याकडे पाठ केल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात यंदाच्या वर्षात आलेल्या अनुदानापैकी आजस्थितीत दोन कोटी रुपये अद्यापही अखर्चित असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
या योजनेत यंदाच्या आर्थिक वर्षात ६००० शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज केले होते. यापैकी ३००० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचा लाभ मिळाला आहे. तर उर्वरीत शेतकऱ्यांना येत्या दिवसात ठिबक संच मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे संच दिल्यानंतरही जिल्ह्यात सुमारे दोन कोटी रुपये शिल्लक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याउपरही जिल्ह्याच्या कृषी विभागाच्यावतीने नव्या यंत्रांकरिता आणखी रकमेची मागणी केली आहे. ती मागणीही लवकरच पूर्णत्त्वास येणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्याकरिता आॅनलाईन अर्ज करण्याची पद्धत अंमलात आणली आहे. या योजनेतही याच पद्धतीतून अर्ज मागविण्यात येत आहे. शिवाय शेतकऱ्यांनी थेट अर्ज केले तरी शासनाच्यावतीने योजनेचा लाभ दिल्या जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आलेल्या अनुदानाचा पुरेपुर लाभ घेत योजनेकरिता अर्ज करावे असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
पऱ्हाटीचा भुरका करून सेंद्रिय खताची निर्मिती
यंदाच्या खरीपात बोंडअळीने शेतकऱ्यांना चांगलेच जेरीस आणले. या पºहाटीतून पुन्हा या रोगाची शक्यता असल्याने ही पऱ्हाटी जाळून टाकण्याच्या सूचना कृषी तज्ज्ञांनी केल्या आहेत. हे जरी सोपे असले तरी यांत्रिकीकरणाच्या काळात जाळण्यापेक्षा या पºहाटीचे खत करून शेताला सेंद्रिय खत देणे शक्य असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अनुदानावर मिळणाºया स्प्रेडरच्या माध्यमातून या पºहाटीचा भुरका करून तो शेतात टाकल्यास उत्तम खत निर्माण होणे शक्य असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
ट्रॅक्टर आणि स्प्रेडरकरिताही अनुदान
जिल्ह्यात यांत्रिकी शेतीचा टक्का वाढावा याकरिता मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येत आहे. यात ट्रॅक्टरकरिता आणि पऱ्हाटीसह इतर पिकांची भुकटी करण्याकरिता वापरण्यात येत असलेले स्प्रेडर अनुदानावर उपलब्ध करण्यात आले आहे. यात ट्रॅक्टरकरिता सर्वसाधारण शेतकऱ्यांना १ लाख आणि अल्पभुधारक महिला शेतकऱ्याला सव्वालाख रुपये अनुदान देण्यात येत आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
शासनाच्या विविध योजनेतून यांत्रिकी शेती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात अनुदानही देण्यात येत आहे. यात सध्या बोंडअळीमुळे पऱ्हाटी पेटविण्याचा प्रकार सुरू आहे. जर शेतकऱ्यांनी अनुदानावर स्प्रेडर घेत या पऱ्हाटीचा भुरका करून तो शेतात टाकल्यास उत्तम सेंद्रिय खत देणे शक्य आहे.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.