देवळी तालुक्यात दोन हत्या
By admin | Published: September 9, 2016 02:14 AM2016-09-09T02:14:06+5:302016-09-09T02:14:06+5:30
टाकळी (चणाजी) येथे बहिणीला मारहाण करताना विरोध करणाऱ्या साळीची बुधवारी रात्री, तर सोनोरा (ढोक) येथे जुन्या वादातून इसमाची गुरूवारी सकाळी हत्या करण्यात आली.
टाकळी व सोनोरा येथील थरार : साळीवर केले वार
देवळी/विजयगोपाल : टाकळी (चणाजी) येथे बहिणीला मारहाण करताना विरोध करणाऱ्या साळीची बुधवारी रात्री, तर सोनोरा (ढोक) येथे जुन्या वादातून इसमाची गुरूवारी सकाळी हत्या करण्यात आली. एका पाठोपाठ घडलेल्या या दोन थरारांमुळे तालुका हादरला. प्रेमिला दिवाकर भस्मे (२०) रा. टाकळी (चणाजी) व गोविंदा चंफत ठाकरे (५०) रा. सोनोरा (ढोक), अशी मृतकांची नावे आहेत. दोन्ही हत्येतील आरोपींना देवळी व पुलगाव पोलिसांनी गजाआड केले.
सुमेध आनंद मून हा कोणताही कामधंदा करत नव्हता. अशातच त्याला जुगाराचा नाद असल्याने तो नेहमी पत्नीला त्रास देत होता. आई, वडिलांच्या घरून पैसे आणण्यासाठी धमकावून मारहाण करायचा. तो टाकळी येथे सासऱ्याच्या घरापासून काही अंतरावरच राहत असल्याने त्याचे नेहमी येणे-जाणे होते. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास सुमेधने पत्नीला सासऱ्याच्या घरी ओढत नेऊन सासू समोर मारहाण केली. सासुने मध्यस्थी केली असता त्यांनाही ओढताण करून मारहाण केली. सर्वांना कापून टाकण्याची धमकी दिली. मृतक प्रेमिला दिवाकर भस्मे (२०) ही घरी टीव्ही पाहत होती. बहिणीला नेहमी होणारी मारहाण असह्य झाल्याने तिने त्याला विरोध केला. यामुळे चवताळलेल्या सुमेधने प्रेमिलावर सुरीने वार केले. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी देवळी पोलिसांनी आरोपी सुमेध आनंदराव मून रा. टाकळी (चणा) याच्यावर भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करीत अटक केली. प्रेमिला सुस्वभावी व शिक्षित युवती होती. तिने बारावीनंतर डी. फॉर्मची परीक्षा उत्तीर्ण केली होती. नोकरीच्या शोधात ती वर्धा येथे राहत होती. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी ती टाकळी येथे सणासाठी आली होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
दुसरी घटना सोनोरा (ढोक) येथे घडली. जुन्या वादातून एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना गुरूवारी सकाळी ८ वाजता घडली. गोविंद चंफत ठाकरे (५०) रा. सोनोरा (ढोक) असे मृतकाचे नाव आहे.
पोळ्याच्या दिवशी गोविंद ठाकरे व गजानन चंद्रभान नागपुरे (३५) यांच्यात वाद झाला होता. यावेळी गोविंदने गजाननला मारहाण केली होती. यामुळे दोघांमध्ये वैर आले होते. यातच गोविंदने गुरूवारी सकाळी गजाननचे दुसऱ्या वस्तीतील घर गाठून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तो शिव्या देत त्याच्या घरात शिरला. यामुळे संतापलेल्या गजाननने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्राने वार केले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी गजानन चंद्रभान नागपुरे, मंगेश नागपुरे (२७), चंद्रभान नागपुरे व माधुरी गजानन नागपुरे (३०) यांच्याविरूद्ध कलम १४७, १४८, १४९, ३०२, ३०७ अन्वये गुन्हा दाखल करीत चौघांनाही अटक केली. पुढील तपास सुरू आहे.(प्रतिनिधी/वार्ताहर)