नाल्याच्या पुरात शेतकऱ्यासह महिला मजूर गेली वाहून; परिसरात खळबळ; शोधाशोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 06:30 PM2021-07-22T18:30:12+5:302021-07-22T18:33:45+5:30
नाल्याचा पुरात दोघे गेले वाहून; समुद्रपूर तालुक्यातील घटना
समुद्रपूर(वर्धा): जिल्ह्यात बुधवारपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गुरुवारीही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु असल्याने समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला तर लालनाला प्रकल्पाचे पाच दारे उघडण्यात आली. यामुळे नदी, नाले दुथड्याभरुन वाहत असल्याने या पुरात शेतकऱ्यासह एक महिला मजूर वाहून गेल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून दोघांचाही शोध सुरु आहे.
समुद्रपूर नजीकच्या लाहोरी मार्गावरील वाघाडी नाल्याला आलेल्या पुरात शेतात निंदणाकरिता गेलेली रंभाबाई नामदेव मेश्राम रा. समुद्रपूर ही महिला वाहून गेली. तसेच तास या गावातील शेतकरी संतोष पंढरी शंभरकर हे गावालगतच्या नाल्याला आलेल्या पुरात बैलबंडीसह वाहून गेले. एकाच तालुक्यातील दोन व्यक्ती वाहून गेल्याने तालुका प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे. दोघांचाही शोध सुरु असून वृत्त लिहेपर्यंत दोघांचाही पत्ता लागला नाही.