'व्हाइट कॉलर' वाळू चोरटे आणखी किती लोकांचे बळी घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 02:49 PM2021-12-23T14:49:10+5:302021-12-23T14:57:58+5:30
अंधार पडताच खेड्यापाड्यांतील नदी-नाल्यांकडे धाव घेणाऱ्या वाळूचोरट्यांच्या वाहनाने देवळीतील दोघांचा बळी गेला. यापूर्वीही तालुक्यात अशा घटना घडल्या असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वाळूचोरांची हिंमत आणखीनच वाढत आहे.
वर्धा : गावगाड्यात लोकप्रतिनिधी म्हणून मिरविणाऱ्यांनी आता आपला मोर्चा वाळूचोरीकडे वळविला आहे. अंधार पडताच खेड्यापाड्यांतील नदी-नाल्यांकडे धाव घेणाऱ्या वाळूचोरट्यांच्या वाहनाने देवळीतील दोन कर्त्या व्यक्तींचा बळी घेतला आहे. यापूर्वीही तालुक्यात अशा अपघातांच्या घटना घडल्या असून, महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वाळूचोरांची हिंमत आणखीनच वाढत आहे. पैसे कमाविण्याच्या हव्यासापोटी हे वाळू चोरटे आणखी किती लोकांचे बळी घेणार? असा सवाल मृत मजुरांच्या परिवारांनी उपस्थित केला आहे.
देवळीतील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांनी गेल्या एक ते दीड वर्षापासून सोनगाव शिवारातील नदी-नाल्यांतून वाळू चोरीचा गोरखधंदा सुरू केल्याचे गावकरी सांगतात. त्यांच्याच कामावर असलेले मजूर सोमवारी एम.एच. ३२ ए.एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने वाळू भरण्याकरिता सोनेगाव (बाई)कडे जात होते. सकाळी सात वाजताच्या सुमारास अडेगाव येथे ट्रॅक्टरचा अपघात होऊन अनिल सुरेश लाकडे (वय ३३) व ऋतिक दिनेश वानखेडे (२४) या युवकांना जीव गमवावा लागला; तर पाच मजूर गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृतांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून ऋतिक हा घरातील एकुलता एक मुलगा असून त्याच्या हातमजुरीवर त्याच्या घरची चूल पेटायची; तर अनिलचीही परिस्थिती जेमतेम असून त्याला दोन लहान मुली, पत्नी, वृद्ध आई असा परिवार आहे. या दोघांच्याही मृत्यूने परिवार उघड्यावर आला आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारांना आता आधार कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
साधी कुटुंबीयांची विचारणाही केली नाही!
घटनेच्या दिवशी पहाटे पाच वाजता ट्रॅक्टरमालक गौतम पोपटकर यांच्या सांगण्यावरून मृत अनिल व ऋतिक या दोघांनाही झोपेतून उठवून नेले होते. तसेच घटना घडल्यानंतर रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करूनही पोपटकर यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच साधी माणुसकी म्हणून विचारणाही केली नसल्याचे मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ट्रॅक्टरमालक यांच्यावर अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने संताप व्यक्त होत असून, तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
वाळू चोरी हा गुन्हा नाही का
अपघातग्रस्त टॅक्टरची कागदपत्रे, गाडीचे नॉमिनेशन, गाडीचा इन्शुरन्स, तसेच इतर कागदपत्रांबाबतची माहिती आरटीओकडून घेऊन तपास केला जात असल्याची माहिती देवळी पोलिसांनी दिली आहे. या कागदपत्रांत तफावत आढळून आल्यास गाडी मालक पोपटकर यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे; पण हे मजूर मालकांच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर घेऊन वाळू चोरीकरिता जात होते. यादरम्यान अपघात होऊन दोघांना जीव गमवावा लागला. त्यामुळे वाळूचोरी हा गुन्हा ठरत नाही का? परिणामी ट्रॅक्टर मालकही आरोपी नाही का? असा प्रश्न देवळीतील नागरिकांकडून विचारला जात आहे.
अटकपूर्व जामिनासाठी साथ?
यापूर्वी वाळूच्या वाहनाखाली दबून मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाहन चालक व मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याही प्रकरणामध्ये ट्रॅक्टर मालक पोपटकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पोपटकर यांना अटकेपासून वाचविण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून तर पोलीस मोकळीक देत नाही ना, असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असल्याने पोलिसांप्रती संशयाचे वलय निर्माण होत आहे.