पिकनीकला आलेल्या दोन गटात राडा; एकाची चाकूने भोसकून हत्या
By चैतन्य जोशी | Published: September 24, 2022 04:28 PM2022-09-24T16:28:06+5:302022-09-24T16:45:09+5:30
बोरधरण येथे खुनाचा थरार : जखमी आरोपीवर नागपूर येथे उपचार सुरु
वर्धा : नागपूर जिल्ह्याच्या अगदी काही दूर अंतरावर असलेल्या व सेलू तालुक्यात येणाऱ्या बोर व्याघ्र प्रकल्प बोरधरण तलावावर पिकनीकला आलेले दोन गट किरकोळ वादातून आपआपसात भिडले अन् एका गटातील युवकाने कारमधून चाकू काढून दुसऱ्या गटातील युवकाच्या थेट छातीत भोसकला.
ही चित्तथरारक घटना शुक्रवारी सांयकाळी ६.१५ वाजता घडली. या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने बोरधरण परिसरात पिकनीकला आलेल्यांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली. नीलेश लक्ष्मण लाजुरकर (३६) रा. टाकळघाट जि. नागपूर असे मृतक युवकाचे नाव आहे. तर समीर मोतीलाल हांडे (३३) असे जखमी आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती सेलू ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.
मृतक निलेश लक्ष्मण लाजुरकर त्याचा भाऊ आशिष लाजूरकर आणि सात ते आठ मित्र नागपूर येथून एम.एच. २९ आर. ३२१९, एम.एच. ४० डी.जे. ८२७८ आणि एम.एच. ४० सी.ए. २२१९ क्रमांकाच्या तीन चारचाकींमधून बोरधरण येथील तलाव परिसरात पिकनीकला आले होते. त्यांनी त्यांची वाहने रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. दरम्यान आरोपी समीर मोतीलाल हांडे हा त्याच्या काही मित्रांसह एम.एच. ३१ एफ.ए. ००५२ क्रमांकाच्या कारने जात असताना आरोपी समीर याने निलेशच्या कारवर हाताने थापा मारल्या. दरम्यान दोन्ही गटांत शाब्दीक वाद उफाळला. संतापलेल्या समीरने जवळील चाकूने निलेशच्या छातीत एक वार केला. ही बाब पाहून निलेशच्या मित्रांनी आरोपी समीरला चांगलाच चोपला.
जखमी अवस्थेत निलेशला बुट्टीबोरी येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी निलेशचा भाऊ आशिष लाजूरकर याने सेलू पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन विविध कलमान्वये आठ ते नऊ युवकांवर गुन्हा दाखल केला. जखमी आरोपी समीरला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती नाजूक असल्याने नागपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.
असा घडला घटनाक्रम...
मृतक नीलेश लाजुरकर, आशिष लाजुरकर, वेदनारायण मोरवाल, मोहन जिल्हारे, चंद्रशेखर कावळे, दिलावर कावळे, रविंद्र कावळे, अभय बलवीर, रवी पांगुळ हे सर्व तीन चारचाकीमधून बोरधरण येथे आले होते. तलावकाठी स्वयंपाक बनवून त्यांनी जेवण केले. सांयकाळच्या सुमारास समीर हांडे याने नीलेशच्या कारला दोन ते तीन थापा मारल्याने दोन्ही गटात चांगलाच राडा झाला. दरम्यान समीरने नीलेशच्या छातीत चाकू भोसकून त्याची हत्या केली.