जुगारात हरलेली रक्कम फेडण्यासाठी अवलंबिला दोघांनी लुटमारीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 05:00 AM2021-03-21T05:00:00+5:302021-03-21T05:00:15+5:30

पोलीस शिपाई अजय अनंतवार हे महाराष्ट्र बँकेलगतच्या टपरीवर चहा पीत असताना त्यांना लुटपाट प्रकरणातील एक चोरटा निदर्शनास आला. अजय अनंतवार यांनी त्यास आवाज देत त्यांनी जवळ बोलाविले. पण, त्यांचा बेत हेरून त्याने दुचाकीने पळविली. अजय अनंतवार यांनी दुचाकीने त्याचा ५०० मीटर अंतरापर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करीत त्यास पकडले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुलीही दिली.

The two resort to looting to repay the money lost in gambling | जुगारात हरलेली रक्कम फेडण्यासाठी अवलंबिला दोघांनी लुटमारीचा मार्ग

जुगारात हरलेली रक्कम फेडण्यासाठी अवलंबिला दोघांनी लुटमारीचा मार्ग

Next
ठळक मुद्देचोरट्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी : दुचाकीसह दीड लाखांची रक्कम केली हस्तगत, आणखी गुन्हे येणार उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निवृत्त वयोवृद्धांना हेरून त्यांच्याकडील रक्कम लुटून नेणाऱ्या दोन चोरट्यांना रामनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या दोघांनाही जुगार खेळण्याचा नाद असून, जुगारात झालेले कर्ज फेडण्यासाठी ते वृद्धांकडून रक्कम हिसकत असल्याचे पुढे आले आहे. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. रामनगर पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि अंदाजे दीड लाख रुपयांची रक्कमही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांनी अटक केलेले नीलेश गिरडकर आणि चंद्रकांत काटकर हे एकुर्ली येथील रहिवासी आहेत. दोघांनाही जुगार खेळण्याचे व्यसन जडले होते. जुगार खेळण्यासाठी त्यांनी कर्जही घेतले होते. जुगारात ही रक्कम हरल्याने कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न त्यांनी निवृत्ती वेतनधारक वृद्धांना लुटण्याचा डाव आखून सोडविला. दोघांनीही अनेक दिवस वर्ध्यातील विविध बँकांमध्ये जाऊन तेथील सुरक्षा काय आहे, याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारी रोजी पहिला डाव साधला. वृद्धाला लुटल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर असलेले संपूर्ण कर्ज फेडले. पण, सहज पैसे कमविण्याचा मार्ग सापडल्याने दोघांचीही हिंमत वाढली. १२ मार्च रोजी पुन्हा त्यांनी एका वृद्धाला हिंदनगर परिसरात लुटले. दोन्ही घटना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पोलीस सतर्क झाले होते. अखेर रामनगर पोलिसांना  चोरट्यांना गजाआड केले.

सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला चोरटा

रामनगर ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक शहरातील बँकांपुढे सापळा रचून होते. सिव्हिल ड्रेसवर पोलीस बँकेत दबा धरून बसले होते. ठाणेदार जळक यांनी एकाच बँकेऐवजी काही पोलिसांना बँक ऑफ महाराष्ट्रजवळ थांबण्यास सांगितले. पोलीस शिपाई अजय अनंतवार हे महाराष्ट्र बँकेलगतच्या टपरीवर चहा पीत असताना त्यांना लुटपाट प्रकरणातील एक चोरटा निदर्शनास आला. अजय अनंतवार यांनी त्यास आवाज देत त्यांनी जवळ बोलाविले. पण, त्यांचा बेत हेरून त्याने दुचाकीने पळविली. अजय अनंतवार यांनी दुचाकीने त्याचा ५०० मीटर अंतरापर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करीत त्यास पकडले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुलीही दिली. ठाणेदार जळक यांना माहिती दिल्यानंतर दुसऱ्याही आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले. 

सुमारे ४० दुचाकींची केली होती तपासणी 
शहरात लागोपाठ वृद्धांना लुटल्याच्या घटनांनी पोलिसांवरील ताण वाढला होता. शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.ठाणेदार धनाजी जळक यांनी  कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत चोरट्यांना गजाआड करण्याच्या सूचना केल्या. कर्मचाऱ्यांनी बँकेतून प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, तब्बल ४० ते ५० दुचाकींची गोपनीय पद्धतीने तपासणी करीत चोरांना अटक करण्यात यश आले.

प्रशस्तीपत्र देऊन कर्मचाऱ्यांना दिले ‘बुस्टर’
पादचारी वृद्धांना निर्जन स्थळी लुटण्याच्या दोन घटनांनी शहरात खळबळ उडली. रामनगर ठाण्यातील कर्मचारी आरोपींच्या शोधात दीड ते दोन महिन्यांपासून होते. अखेर त्यांनी दिवस-रात्र एक करीत तपास करून चोरट्यांना गजाआड केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या हस्ते ठाणेदार धनाजी जळक आणि त्यांच्या टीमला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कर्मचाऱ्यांची कमतरता तरीही उत्कृष्ट कामगिरी 
रामनगर पोलीस ठाण्यात ११० पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ८३ पोलीस कर्मचारी कार्यरत असून २७ पदे अजूनही रिक्त आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी चार आजाराने त्रस्त असल्याने सुटीवर आहेत, तर पाच जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे विविध गुन्ह्यांचा तसेच तपासाचा मोठा ताण आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

देवळी, बुटीबोरीसह इतर विविध ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता... 
जिल्ह्यातील देवळीसह इतर शहरात तसेच नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी गावात झालेल्या अशाच पद्धतीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे पोलिसांकडून आरोपींची कसून चाैकशी सुरू आहे. 

 

Web Title: The two resort to looting to repay the money lost in gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.