लाकडाची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 10:11 PM2019-02-26T22:11:30+5:302019-02-26T22:12:21+5:30
विकासाच्या नावाखाली सध्या अवैध वृक्षकत्तलीला उधाण आल्याचे चित्र बघावयास मिळते. याच पाश्वभूमिवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून लाकडू भरलेली दोन मालवाहू पकडली. सदर वाहनचालकांकडे लाकडाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने लाकूड व मालवाहू वाहने जप्त केली आहे. जप्त केलेला हा मुद्देमाल लाखोंच्या घरात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विकासाच्या नावाखाली सध्या अवैध वृक्षकत्तलीला उधाण आल्याचे चित्र बघावयास मिळते. याच पाश्वभूमिवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून लाकडू भरलेली दोन मालवाहू पकडली. सदर वाहनचालकांकडे लाकडाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने लाकूड व मालवाहू वाहने जप्त केली आहे. जप्त केलेला हा मुद्देमाल लाखोंच्या घरात आहे.
प्राप्त माहितीनुसार, वनविभागाचे फिरते पथक गस्तीवर असताना सदर पथकातील अधिकाऱ्यांना आर्वी मार्गाने लाकडाची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे सापळा रचून वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी येळाकेळी येथे एम.एच. ३० बी. २२४४ क्रमांकाचा मालवाहू अडवून पाहणी केली असता त्यात लाकुडसाठा आढळून आला. यावेळी वनविभागाच्या अधिकाºयांनी चालकाला लाकुड वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मागणी केली असता ते नसल्याने सदर मालवाहू आणि वाहनातील लाकुड असा एकूण सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे लाकुड वर्धा येथील लिलू पटेल यांच्या मालकीच्या सुरक्षित ठिकाणी नेले जात होते, असे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी ए. एन. कोट्टेवार, एस. एस. धोडके, व्ही. एल. खेलकर यांनी केली. तर दुसरी कारवाई कानगाव मार्गावरील पात्री शिवारात करण्यात आली. तेथे काही वाहनाची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता एम.एच. १५ बी.जे. ५०४७ क्रमांकाच्या मालवाहूत मोठ्या प्रमाणात लाकुड आढळून आले. सदर वाहन चालकाला लाकुड वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता ते त्याच्याकडे नसल्याने मालवाहू व वाहनातील लाकुड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केले आहे. सदर एकूण मुद्देमाल अडीच लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांच्या मार्गदर्शनात एस. आर. परडके, जे. बी. शेख, व्ही. बी. सोनवणे यांनी केली.