शेती साहित्य चोरुन चोरटे विकायचे भंगारात दोघांना बेड्या, एक ताब्यात
By चैतन्य जोशी | Published: October 23, 2023 07:51 PM2023-10-23T19:51:40+5:302023-10-23T19:51:48+5:30
चोरीतील साहित्य केले हस्तगत
वर्धा : शेतातील शेतीपयोगी साहित्य तसेच मोटारपंप चोरुन ते साहित्य भंगार विक्रेत्याला विकणाऱ्या तिघांच्या टोळीचा पर्दाफाश सावंगी पोलिसांनी केला. दोघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. सावंगी पोलिसांनी याप्रकरणी चोरीतील साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला.
आशीष नरेश घोंगडे (२८), नारायण पुरुषोत्तम पाराशर (२३) दोन्ही रा. येळाकेळी अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहे. तर अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आकाश बंडु धांदे रा. साटोडा यांच्या शेतातील विहिरीवरुन अज्ञात चोरट्याने विहिरीवरील पाण्याची मोटारपंप, त्रेशरची मोटार तसेच त्यांच्याच शेतालगतच्या अनिल भानसे, रमेश माणीककुडे यांच्या शेतातील विहिरीवरुन पाण्याच्या मोटारी चोरुन नेल्या होत्या. याबाबतची तक्रार त्यांनी सावंगी पोलिसात दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला असता पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवला असता त्यांनी चोरीची कबूली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ऑटो जप्त करीत दोघांना अटक करुन एकास ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या निर्देशात पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात सतीश दरवरे, अनिल वैद्य, भुषण निघोट, स्वप्नील मोरे, निलेश सडमाके, निखील फुटाने, अमोल जाधव यांनी केली. पुढील तपास अनिल वैद्य करीत आहेत.
तीन ठाण्यांंतर्गतच्या चोरी उघडकीस
सावंगी पोलिसांनी चोरट्यांना पोलिसी हिसका दाखवला असता चोरट्यांनी सावंगी, खरांगणा आणि देवळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही शेतीउपयोगी साहित्य चोरुन नेल्याची कबूली दिली असल्याने आणखी गुन्हे उघडकीस येणार आहे.
भंगार दुकानातून साहित्य जप्त
चोरटे चोरी केलेले साहित्य इतवारा बाजार परिसरात असलेला भंगार विक्रेता शोएब खान याला विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुन्ह्यात चोरी गेलेले ५३ हजार रुपयांचे शेती साहित्य हस्तगत करुन गुन्हा दाखल केला.
एसपींचे निर्देश अन् तत्काळ तपास
मागील काही दिवसांपासून शेत शिवारात अज्ञात चोरट्यांकडून शेतीउपयोगी साहित्य चोरी होत असल्याच्या घटना घडत होत्या. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. घडत असलेल्या चोऱ्यांची तत्काळ उकल करण्याबाबत पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांना निर्देशीत केले होते. जळक यांनी अधिनस्थ पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना देत योग्य मार्गदर्शन केल्याने चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला.