ट्रेलरची दुचाकीला धडक, दोघे ठार
By admin | Published: January 21, 2017 12:57 AM2017-01-21T00:57:58+5:302017-01-21T00:57:58+5:30
नागपूर येथून हिंगणघाट येथे जात असताना जाम शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर संतराम हॉटेलजवळ ट्रेलरने दुचाकीला जबर धडक दिली.
जाम शिवारातील अपघात : हेल्मेटचाही झाला चुराडा
समुद्रपूर : नागपूर येथून हिंगणघाट येथे जात असताना जाम शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर संतराम हॉटेलजवळ ट्रेलरने दुचाकीला जबर धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झाला. निकेश बाजीराव जीवणे (३७) रा. शास्त्री वॉर्ड हिंगणघाट व केशव संभाजी वैतागे (२९) रा. वालधूर, ता. हिंगणघाट, अशी मृतकांची नावे आहे.
जाम शिवारातील नागपूर-चंद्रपूर महामार्गावर ट्रेलर क्र.एमएच ३४ एबी २३०९ ने दुचाकी क्र एमएच ३२ यू ७७८० ला मागाहून धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाली. हेल्मेट घालून असताना हेलमेटचा चुराडा झाला. माहिती मिळताच वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक सुरेश भोयर, राजेंद्र टेंभुर्णे, दिलीप वांदिले, दिनेश धवने, कंचन नावहते यांनी जखमींना रुगणालयात दाखल केले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
निकेश जीवणे हे गवंडी काम करीत होते. त्यांच्यासोबत केशवही तेच काम करीत होता. घटनेच्या दिवशी ते काम पाहण्यासाठीच नागपूर येथे गेले होते. परत येत असताना हा अपघात झाला.(तालुका प्रतिनिधी)
रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव
समुद्रपूर : ग्रामीण रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे. काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालये थाटले. ते रुग्णालयाकडे कमी व खासगी दवाखान्यांत अधिक लक्ष देतात. राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असते. गुरूवारी रात्रीही अपघात झाल्याने दोघांना जीव गमवावा लागला. यात नागलग मृतांची ओळख पटावी म्हणून रुग्णालयात जमले असताना वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नव्हते. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत होता.
कायम डॉक्टरच्या नियुक्तीची मागणी
समुद्रपूर : ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहत नसल्याने रुग्णसेवेवर विपरित परिणाम होत आहे. गुरूवारीही रात्री मृतकांचे नातलग ओळख पटविण्यासाठी रुग्णालयात धडकले. यावेळी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने तनाव निर्माण झाला होता.
अपघातात जखमींना रुग्णालयात दाखल केले असता परिचारिकेने डॉ. नरवाडे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. यानंतर तब्बल अर्ध्या तासाने डॉक्टर रुगणालयात पोहोचले. या प्रकारामुळे नातलगांनी डॉ. नरवाडे यांच्याशी वाद घातला. रुग्णालयात तीन एमबीबीएस, दोन बीएएमएस डॉक्टर आहे. ते एकमेकांना विश्वासात घेत कर्तव्यावर असतात. तालुक्यात दरवर्षी सर्पदंशाच्या घटना घडतात. यात रुग्ण दगावतात. त्यांना उपचार मिळणे कठीण होते. यामुळे रुग्णालयात कायम व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
मला पगार मिळत नसून केवळ १६ हजार रुपये मासिक मानधन आहे. कर्तव्यानंतर खासगी उपचार करतो. माझे काम शाळा व अंगणवाडीच्या बालकांना तपासणी करण्याचे आहे. रुग्णालयात सेवा देणे बंधकारक नाही. मानवीय दृष्टीकोनातून वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णालयात काम करतो. गुरूवारी रात्री अपघातात रुग्ण दगावल्याने त्यांचे नातलग शोकमग्न होते. मी त्यांना येथे रुग्ण भरती असल्याने त्यांना त्रास होतो, असे समजावले.
- डॉ. रवीप्रसाद नरवाडे
ग्रामीण रुग्णालय, समुद्रपूर.