अमरावतीच्या युवकांकडून वर्धेत दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:45 AM2018-03-17T00:45:15+5:302018-03-17T00:45:15+5:30
अमरावती येथून वर्धेत येत आपले महागडे शौक पूर्ण करण्याकरिता दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना सावंगी (मेघे) पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच हे तिघे अट्टल दुचाकी चोर असल्याचे समोर आले आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : अमरावती येथून वर्धेत येत आपले महागडे शौक पूर्ण करण्याकरिता दुचाकी चोरणाऱ्या तीन युवकांना सावंगी (मेघे) पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच हे तिघे अट्टल दुचाकी चोर असल्याचे समोर आले आहे. या तिघांकडून पोलिसांनी तब्बल १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. वर्धा शहरातील न्यू इंग्लिश शाळेजवळून दुचाकी चोरताना एक तरुण सीसीटीव्हीत कैद झाला होता. हा सुगावा या टोळीला जेरबंद करण्यासाठी महत्त्वाचा ठरला.
पंकज उर्फ गोलू सुर्यवंशी (२५), आकाश चव्हान (२०) व मयुर सोळंकी (२२) सर्व रा. अमरावती, अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली. या चोरट्यांकडून आणखी दुचाकी जप्त होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. त्या दिशेने तपासही सुरू आहे. दुचाकी चोरी करताना पंकज सूर्यवंशी हा सीसीटीव्हीत कैद झाला होता. सदर चित्रिकरण पोलिसांना मिळताच तपासाला गती देण्यात आली. दरम्यान गोपनिय माहितीच्या आधारे सर्व प्रथम पोलिसांनी पंकजला ताब्यात घेतले. त्याने पोलिसी प्रसाद मिळताच गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची माहिती दिली. त्यावरून आकाश चव्हाण व मयुर सोळंकी या दोघांनाही अटक करण्यात आली. अमरावती येथील रहिवासी असलेल्या या तिनही चोरट्यांविरुद्ध यापूर्वी चोरीचे कुठलेही गुन्हे दाखल नसले तरी त्यांच्याकडून १८ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहे.
फायनान्सचे कारण पुढे करुन दुचाकीची विक्री
जेरबंद करण्यात आलेल्या तिनही आरोपींनी वर्धा जिल्ह्यातील विविध भागातून व जिल्ह्याबाहेरूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. सदर तरुण दुचाकी खरेदी करणाºयांना दुचाकीवर फायनान्सचे काही पैसे शिल्लक आहेत, ते तूम्ही देऊन दुचाकी ठेऊन घ्या, असे सांगत विक्री करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.