गौरी विसर्जनासाठी गेलेल्या दोन महिला व दोन मुलांना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 04:24 PM2019-09-02T16:24:48+5:302019-09-02T16:26:30+5:30
हिंगणघाट येथील वणा नदीच्या काठावर गौरी विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह दोन मुले बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: हिंगणघाट येथील वणा नदीच्या काठावर गौरी विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह दोन मुले बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
येथील कवडघाट येथे सकाळी काही महिला गौरी विसर्जन करण्यासाठी गेल्या होत्या. त्यात रिया भगत (३५) ही महिला पण होती. त्यांचा मुलगा अभि (१०) व मुलगी अंजना (१३) हेही सोबत होते. नदीपात्रात उतरलेल्या आईसोबत अभिही गेला होता. त्यावेळी नदीच्या प्रवाहाला वेग असल्याने अभि नदीत वाहून जाऊ लागल्याचे दिसताच, त्याची बहिण अंजना त्याला वाचवण्यासाठी धावली. मात्र तीही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत असल्याचे पाहून त्यांची आई रिया हिने धाव घेतली. या तिघांनाही वाहताना पाहून नदी काठावर असलेल्या दिपाली मारोती भटे या महिलेनेही नदीत उतरून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने हे चारही जण प्रवाहासोबत वाहत गेले.
नदीच्या पात्रात चार जण वाहून जात असल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस रामदास चकोले यांनी नदी पात्रात उडी घेऊन रिया भगत यांना पाण्याबाहेर काढले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत. त्यांच्या शोधासाठी एनडीआरएफच्या चमूला पाचारण केले आहे. आ. समीर कुणावर यांनी घटनास्थळी पोहचून प्रशासकीय यंत्रणेला तातडीने कारवाई करण्याचे निर्र्देश दिले आहेत.