वर्धा नदीत पोहण्यास उतरलेल्या दाेन तरुणांचा बुडून मृत्यू; दोघे बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 11:08 AM2022-03-07T11:08:06+5:302022-03-07T11:21:20+5:30
रविवारी दुपारच्या सुमारास पिपरी येथील चार मित्र आजनसरा येथून दुचाकीने हिवरा गावात असलेल्या वर्धा नदीपात्रात पोहायला गेले होते.
वर्धा :नदीत पोहायला गेलेल्या चार युवकांपैकी दोन युवकांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला, तर दोनजण बचावले. ही धक्कादायक घटना रविवारी ६ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास हिवरा येथे उघडकीस आली.
रुतीक नरेश पोखळे (२१) आणि संघर्ष चंदू लढे (१८) दोन्ही रा. पिपरी असे मृतक युवकांची नावे आहे. तर रणजित रामजी धाबर्डे (२८) आणि शुभम सुधाकर लढे (२६) अशी इतर दोघांची नावे आहेत.
रविवारी दुपारच्या सुमारास पिपरी येथील ऋतिक पोकळे, संघर्ष लढे, रणजित धाबर्डे आणि शुभम लढे हे चार जीवलग मित्र आजनसरा येथून दुचाकीने हिवरा गावात असलेल्या वर्धा नदीपात्रात पोहायला गेले होते. मात्र, या चौघा मित्रांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने चारही युवक नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच हिवरा येथील नागरिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली.
याची माहिती वडनेर पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक बागडे, प्रशांत वैद्य, आशिष डफ, अमोल खाडे, तुषार इंगळे, गुणवंता चिडाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने रुतीक नरेश पोखळे आणि संघर्ष चंदू लढे या दोघांचे मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आले. तर रणजित धाबर्डे आणि शुभम लढे हे दोघे बचावले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.