घोगरा धबधब्यात बुडून दाेन तरुणांचा मृत्यू; दोन दिवसांत दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 12:21 PM2022-10-29T12:21:00+5:302022-10-29T12:22:43+5:30
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
झडशी (वर्धा) : सेलू तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा प्रकल्पाच्या घोगरा धबधब्यावर दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्याच धबधब्यात दोन तरुण बुडाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सौरभ मनोहर बवारकर (३०) रा. पंजाब कॉलनी वर्धा व विकास रामदास नवघरे (३४) रा. सेवाग्राम अशी मृतांची नावे असल्याचे सांगण्यात आले. दोघेही आपल्या दोन मित्रांसोबत रिधोरा येथील पंचधारा धरणावर फिरायला गेले होते. यावेळी हे चौघेही धरणामागील घोगरा धबधब्यावर गेले असता त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही.
या चौघांनीही तेथील पाण्यामध्ये उडी घेतली असता ते पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खावू लागले. ही बाब इतर युवकांच्या लक्षात येताच त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. चौघेही एकमेकांचे केस धरून असल्याने दोघांना वाचविण्यात यश आले. पण, सौरभ आणि विकास यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती सेलू पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र कोहळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठले. पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. याप्रकरणी तपास सेलू पोलीस करीत आहेत. या धबधब्यात पोहण्याचा मोह अनेकांच्या जिवावर बेतला असून येथे सुरक्षा देण्याची मागणी होत असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दिवसेंदिवस घटना वाढत आहेत.