दोन युवकांचा नदीत बुडून मृत्यू, उत्तर प्रदेशमधून आले होते पीओपी काम करायला!
By रवींद्र चांदेकर | Published: August 15, 2024 05:11 PM2024-08-15T17:11:01+5:302024-08-15T17:11:29+5:30
पवनार येथील अर्जुन, दीपक पाटील यांनी शोध मोहीम राबवित एकाला बाहेर काढले.
वर्धा : स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने गुरुवारी पवनार धाम तीरावर अनेक पर्यटकांची गर्दी होती. याच गर्दीमध्ये बलरामपूर उत्तर प्रदेशमधून पीओपीचे काम करायला सब्बू नामक ठेकेदारासोबत आलेले चार, पाच युवकसुद्धा होते. सध्या धाम नदी खळखळून वाहत असून या युवकांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. प्रथम नसीम खान (२५) हा पाण्यात उतरला. खोल पाण्याच्या अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्यासोबत असलेल्या जुमाई खान (२०) याला थोड फार पोहता येत असल्याने तो नसीमला वाचवायला पाण्यात उतरला. त्याने नसीमचा हातसुद्धा पकडला. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते दोघेही वाहत गेले. त्यांचासोबत असलेल्या युवकांनी आरडाओरडा केला. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
पवनार येथील अर्जुन, दीपक पाटील यांनी शोध मोहीम राबवित एकाला बाहेर काढले. दुसऱ्याचा मात्र शोध सुरू आहे. सेवाग्रामचे पोलिस निरीक्षक विनीत घागे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत आश्रम परिसरात झालेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविले. एकाचा मृतदेह शासकीय दवाखान्यात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला असून सेवाग्राम पोलीस पुढील कार्यवाही करीत आहे. ही घटना दुपारी १:०० वाजताच्या सुमारास छत्री शेजारी असलेल्या पालखी डोहात घडली.