'दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा...' उध्दव ठाकरेंचा पीेएम मोदींवर घणाघात
By रवींद्र चांदेकर | Published: April 22, 2024 09:52 PM2024-04-22T21:52:44+5:302024-04-22T21:53:00+5:30
संविधानाला धक्का लावण्याचे काम - शरद पवार
रवींद्र चांदेकर/हिंगणघाट (वर्धा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व उद्योग गुजरातला पळवून नेत आहे. दुसरीकडे विदर्भात बेकारी वाढत आहे. गेल्या १० वर्षात एकही उद्योग येथे आला नाही. जगाचा पोशिंदा संकटात आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. तरीही ‘दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’ असे नरेंद्र मोदी म्हणत आहे. त्यांनी गुजरातला सर्व उद्योग नेल्याने आता मोदी यांनाही गुजरातला परत जा म्हणण्याची वेळ आली आहे, असा घणाघात उध्दवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.
जिल्ह्यातील हिंगणघाट येथील टाका मैदानावर महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, पक्ष फोडून त्यांनी गद्दारांना ५० खोके दिले. मी गेलो असतो, तर किती खोके मिळाले असते. मात्र, माझे वैभव शिवसैनिक आहे. मुलाला मुख्यमंत्री करायचे होते म्हणून मी भाजपशी युती तोडली, असे ते सांगतात. पण मुख्यमंत्री होणे म्हणजे क्रिकेट कंट्रोल बार्डाचे अध्यक्षपद आहे का, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेशी गद्दारी झाली. निवडणूक आयोगानेही मोदी, अमित शहा यांच्या दबावाखाली आमचे चिन्ह गद्दारांना दिले. ते म्हणतात, आमची नकली सेना आहे. आता हीच सेना तुम्हाला सत्तेवरून खाली खेचतील, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना भाजपने तुरुंगात टाकले. आता ते संविधान बदलण्याची स्वप्ने पाहतात. मात्र, त्यांचे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मंचावर खासदार शरदचंद्र पवार, खासदार संजयसिंग, माजी मंत्री अनिल देशमुख, महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे, चारूलता टोकस, रोहिणी खडसे, आमदार रणजित कांबळे, माजी आमदार वसंतराव बोंडे, प्रकाश पोहरे, शिरीष गोडे, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार राजू तिमांडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, अॅड. सुधीर कोठारी, रविकांत बालपांडे, श्रीकांत मिरापूरकर, सुनील राऊत, राजू खुपसरे, तुषार हुमाड, अतुल वांदिले, पंढरीनाथ कापसे आदी उपस्थित होते.
संविधानाला धक्का लावण्याचे काम - शरद पवार
शरद पवार गटाचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी सत्ताधारी संविधानाला धक्का लावण्याचे काम करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला प्रभावी यंत्रण दिली. त्यालाच सत्ताधारी नख लावू पाहात आहे. मात्र, संविधानाला हात लावल्यास हा देश पटून उठेल, असा इशारा पवार यांनी दिला. काय वाट्टेल करू, मात्र संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न झाल्यास कुणीही स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले. दोन मुख्यमंत्र्यांनी त्यांनी तुरुंगात टाकले. देशात वेगळया विचारसरणीचे लोकचं राहू नये, असे त्यांना वाटते, असा घणाघातही केला. यावेळी खासदार संजय सिंग यांनीही मनोगत व्यक्त केले.