उज्ज्वला गॅस योजनेत गरजूंची होतेय लुट
By Admin | Published: March 2, 2017 12:40 AM2017-03-02T00:40:30+5:302017-03-02T00:40:30+5:30
केंद्र शासनाकडून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उज्ज्वला गॅस योजना राबविली जात आहे.
योजना झाली महाग : प्रशासनाचा कानाडोळा
आकोली : केंद्र शासनाकडून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उज्ज्वला गॅस योजना राबविली जात आहे. यात सिलिंडर व शेगडी वाटप केले जात आहे. या योजनेत नियुक्त वितरक गरजुंची लूट करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
शासनाने उज्वला योजनेत आॅनलाईन अर्ज मागविले असून निवड झालेल्या लाभार्र्थ्यांची यादी सिलिंडर वितरकांना दिली जाते. वितरकांनी कमिशनवर ग्रामीण भागात अनधिकृत एजंट नेमले आहे. ते लाभार्थ्यांची सर्रास लुट करीत आहे. मोफत असणारी ही योजना आता महाग ठरत आहे.
प्रारंभी लाभार्थ्यांच्या घरी येऊन सदरची योजना मोफत आहे; पण कागदपत्रांसाठी ३०० रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले होते. यामुळे लाभार्थ्यांनी ३०० रुपये दिले; पण काल-परवा गॅस, सिलिंडरचे वाटप केले असता ६०० रुपये ग्राहकांना मागण्यात आले. यातील काहींनी ६०० रुपये दिलेत. गोरगरीबांच्या अज्ञानाचा फायदा घेत एजंट ग्राहकांची लूट करताना दिसतात.
आकोली, वायगाव व अन्य गावांत असे प्रकार उघड झाले आहे. एजंटनी अनेक लाभार्थ्यांकडून गैरमार्गाने पैसा उकळला असून हा प्रकार गावोगावी सुरू आहे. याकडे लक्ष देत चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.(वार्ताहर)