एक किमी रस्त्याच्या बांधकामातही गैरप्रकार
By admin | Published: September 8, 2015 04:21 AM2015-09-08T04:21:57+5:302015-09-08T04:21:57+5:30
गावातील मुख्य रस्त्याच्या बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंतचे बांधकाम करण्यात येत आहे. या एक किमी रस्त्याची
अल्लीपूर : गावातील मुख्य रस्त्याच्या बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंतचे बांधकाम करण्यात येत आहे. या एक किमी रस्त्याची दुरूस्ती, रस्ता दुभाजक व नाली सौंदर्यीकरण ही कामे १ कोटी ९० लाख रुपयांत प्रस्तावित होती. या कामाला ३० आॅगस्टपासून सुरूवात झाली. यात गैरप्रकार होत असून बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कामाच्या चौकशीची मागणीही होत आहे.
इस्टीमेट प्रत न देता व ग्रा.पं. ला विश्वासात न घेता काम सुरू आहे. या कामाची खोली ३७ से.मी. असताना केवळ ३० से.मी. करण्यात येत आहे. रस्त्याचे रूंदीकरण करताना ५० टक्के माती मिश्रीत गिट्टी वापरली जात आहे. दुसऱ्या कोटसाठी चार एमएम गिट्टी ही चार मिटरऐवजी एक ते दीड मीटर टाकली जात आहे. उर्वरित दीड मिटरमध्ये माती, मुरूम टाकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधित अभियंता आचार्य व मुख्य अभियंता कुहीकर यांना सूचना दिली. यावरून ग्रामस्थांसमोर पाहणी करून माती मिश्रीत गिट्टी वापरण्यावर बंदी करण्यात आली. माती मिश्रीत गिट्टी काढण्याच्या सूचनाही दिल्या; पण कंत्राटदार कापसे यांनी निकृष्ट काम सुरूच ठेवले. याबाबत माजी ग्रा.पं. सदस्य श्रीराम साखरकर, उपसरपंच रामा धनवीज, ग्रा.पं. सदस्य गोपाल मेघरे तुळशिराम साखरकर, किसना लोणारे, सतीश काळे व ग्रामस्थांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून निकृष्ट काम बंद करण्याचा इशारा दिला. याबाबत बांधकाम विभाग, पोलिसांत तक्रार देण्यात आली.(वार्ताहर)
नियमातच काम होईल- बांधकाम विभाग
४सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १ कोटी ३० लाख रुपये खर्च करून रस्ता दुरूस्ती, दुभाजक व सौंदर्यीकरणाचे काम केले जात आहे. याचे कंत्राट देवळी येथील कंत्राटदारास दिले असून तो निकृष्ट कामे करीत आहे. यामुळे असंतोष पसरला आहे. याबाबतच्या तक्रारीवरून पाहणी झाली. यात माती मिश्रीत मुरूम, गिट्टी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या; पण कंत्राटदार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.
नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी रोडच्या मटेरियलचे सॅम्पल घेऊन परिक्षणासाठी पाठवावे. माझी हकरत नाही. थोडे निकृष्ट काम करून मी माझी पत घालवू शकत नाही.
- पांडुरंग कापसे, कंत्राटदार, देवळी.
४बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता कुहीकर यांना विचारणा केली असता जे काम सुरू आहे ते योग्यच होईल. इस्टीमेट नुसारच काम होईल. जेथे माती काम केले ते खोदून नव्याने योग्य काम करण्यात येईल, असे सांगितले.
प्रत्यक्ष कामाची पाहणी केली असता सदर काम निकृष्ट दर्जाचेच होत आहे.
- रामा धनविज, तक्रारकर्ता.
सदर कामाबाबत ग्रा.पं. ला बांधकाम विभागाने माहिती दिली नाही. शिवाय ना-हरकत प्रमाणपत्रही मागितले नाही.
- ए.व्ही. गव्हाळे, ग्रामविकास अधिकारी.
भविष्यात मुख्य रस्त्यासाठी एवढा निधी येणार नाही. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. इस्टीमेटनुसार काम व्हायला पाहिजे. मुरूमाऐवजी माती व चुरीऐवजी मुरूम वापरला जात आहे.
- श्रीराम साखरकर, माजी ग्रा.पं. सदस्य.