अट्टल दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:13 AM2019-01-20T00:13:12+5:302019-01-20T00:14:27+5:30
येथील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दुचाकी चोरांचा शोध सुरु केला. या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून तब्बल बारा दुचाकी जप्त केल्या. या दुचाकीचे नंबर बदलवून तो वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.): येथील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दुचाकी चोरांचा शोध सुरु केला. या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एका अट्टल दुचाकी चोरट्यालाअटक करुन त्याच्याकडून तब्बल बारा दुचाकी जप्त केल्या. या दुचाकीचे नंबर बदलवून तो वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस आता दुचाकींच्या चेचीस नंबरवरुन मुळ नंबरचा शोध घेत आहे.
प्राप्त माहितीनुसार इमरान खॉ उर्फ सोनू दिलावर खॉ पठाण (२५) रा. काजीपुरा, आष्टी असे आरोपीचे नाव आहे. अमरावती जिल्ह्याच्या तिवासा तालुक्यातील भारवाडी (ठाणाठुणी) येथील विनोद मंगल खाकसे एम. एच. २७ ए.एन. ४७३२ क्रमांकाच्या दुचाकीने भाच्याला सोडण्याकरिता तळेगांव (श्या.पं.) येथील बसस्थानकावर आले होते. बस यायला उशिर असल्याने त्यांनी बसस्थानक परिसरातील साईबाबा मंदिरासमोर दुचाकी उभी करुन चहा पिण्याकरिता गेले असता त्यांची दुचाकी चोरट्याने लंपास केली. यासंदर्भात विनोद खाकसे यांनी ६ डिसेंबरला तळेगाव पोलिसात तक्रार नोंदविल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करित असताना आष्टी येथील इमरान उर्फ सोनू याने ही दुचाकी चोरली असून तो नागपुरात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाचे निलेश पेटकर, विजय उईके, रोशन धाये यांनी नागपूर गाठले. नागपुरात आरोपीच्या शोधात दोन दिवस तळ ठोकला. रात्रीच्या सुमारास आरोपीचा शोध घेतांना तो आष्टीमार्गे मोर्शीकडे जात असल्याची माहिती पोलिसांना तांत्रिक तपासावरुन मिळाली. लगेच नागपुरात असलेल्या पथकाने त्याचा पाठलाग करुन १५ जानेवारीला रात्री चोरीस गेलेल्या एम.एच.२७ ए.एन.४७३२ क्रमांकाच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्याने परिसरातील पाच गुन्हाची कबुली दिली. तसेच आजुबाजुच्या जिल्ह्यातूनही सात दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी या सर्व गुन्हातील १२ दुचाकी जप्त केल्यात. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनात तळेगावचे पोलीस निरीक्षक रवी राठोड, पोलीस उपनिरिक्षक प्रदीपकुमार राठोड, नीलेश पेटकर, सचिन साठे, विजय उईके, रोशन धाये, कुलदीप टांकसाळे, देवेंद्र गुजर, अमोल इंगोले, प्रवीण रोहाड यांनी केली.