शिवसेनेने वाढविल्या तडसांच्या अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:36 PM2019-03-29T23:36:38+5:302019-03-29T23:36:49+5:30
मागील पाच वर्षांच्या काळात भाजप-सेनेची केंद्र व राज्यात सत्ता होती, मात्र या काळात स्थानिक सेना-भाजप नेत्यांत कमालीचे वितुष्ट आले. त्यातून थेट आरोप-प्रत्यारोप झाल्याने दुखावलेली मने निवडणुकीच्या रणधुमाळीत जुळविण्यात भाजपला मोठ्या अडचणी येत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील पाच वर्षांच्या काळात भाजप-सेनेची केंद्र व राज्यात सत्ता होती, मात्र या काळात स्थानिक सेना-भाजप नेत्यांत कमालीचे वितुष्ट आले. त्यातून थेट आरोप-प्रत्यारोप झाल्याने दुखावलेली मने निवडणुकीच्या रणधुमाळीत जुळविण्यात भाजपला मोठ्या अडचणी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपची गोची झाली आहे.
२०१४ मध्ये भाजपने देशात एकहाती सत्ता मिळविली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेना, भाजप दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. गेली साडेचार वर्षे शिवसेना नेत्यांनी भाजपवर सातत्याने टीकेची झोड उठवली. त्याचेच पडसाद वर्धा जिल्ह्यातही उमटले. वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन चालण्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळे शिवसेना सरकारच्या विरोधात अनेकदा आंदोलन करताना दिसली. स्थानिक सेना नेत्यांची मने भाजप नेत्यांशी जुळलीच नाही. त्यामुळे स्थानिक नेते, शिवसेनेचे संपर्क प्रमुख व अन्य पदाधिकारी जिल्ह्यात येऊन भाजपची सत्ता असलेल्या नगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढताना दिसले. यात सेना-भाजपतील तणाव अधिकच वाढत गेला. त्याची परिणती वेळोवेळी दिसून आली. परंतु, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सेना व भाजप यांच्यात युती झाली. त्यामुळे आता भाजपला सेनेची साथ घ्यावी लागत आहे. विद्यमान परिस्थितीत नामांकनपत्र दाखल करताना भाजप उमेदवार खासदार रामदास तडस यांच्यासोबत सेनेचे पदाधिकारी दिसून आले. मात्र, यावेळी आयोजित सभेत शिवसेनेचे नेते अनंत गुढे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे हे भाजपच्या प्रचारापासून अद्याप दूरच आहेत. अनंत गुढे यांनी शिवसैनिकांच्या भावना जपा, असे आवाहन भाजपला केले आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या वर्धा, चंद्र्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे वर्धा जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांचे वडील इंद्रकुमार सराफ यांना काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेना नेत्याच्या घरूनच काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली जात होती. या पार्श्वभूमीवर सेना नेत्यांची काँग्रेसशी जवळीक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत हे संबंध अधिक वाढविण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघात भाजपविरोधात सराफ यांनी वर्धा नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. त्यात सराफ पराभूत झाले. वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनीही कंत्राटदार असलेल्या राजेश सराफ यांच्या विरोधात रस्ता कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तरही सेनेने दिले होते. अशोक शिंदे यांचे काँग्रेसच्या जिल्हास्तरावरील अनेक नेत्यांशी हिंगणघाट मतदारसंघाचे समीकरण लक्षात घेऊन सौख्याचे संबंध आहेत. त्यामुळे अशोक शिंदे भाजपचा प्रचार करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आर्वी विधानसभा मतदारसंघात सेनेचे माजी जिल्हाप्रमुख नीलेश देशमुख हे भाजपसोबत राहतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेची एकूण भूमिका पाहता भाजप अडचणीत येऊ शकते.