सेलू तालुक्यात तीन गावांकरिता एकच जलकुंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:42 PM2019-03-29T23:42:35+5:302019-03-29T23:42:43+5:30
सेलू तालुक्यातील कान्हापूर गटग्रामपंचायतीमध्ये गोंदापूर, गणेशपूर ही गावे येतात. या तिन्ही गावांसाठी एकच जलकुंभ असून गणेशपूरचा पाणीपुरवठा बंदच आहे, तर कान्हापूरच्या शाळेत गत वर्षभरापासून विकतचे पाणी घ्यावे लागत असून यात मुख्याध्यापकाच्याच खिशाला झळ पोहोचत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : सेलू तालुक्यातील कान्हापूर गटग्रामपंचायतीमध्ये गोंदापूर, गणेशपूर ही गावे येतात. या तिन्ही गावांसाठी एकच जलकुंभ असून गणेशपूरचा पाणीपुरवठा बंदच आहे, तर कान्हापूरच्या शाळेत गत वर्षभरापासून विकतचे पाणी घ्यावे लागत असून यात मुख्याध्यापकाच्याच खिशाला झळ पोहोचत आहे.
या गावाची रचना ही यू आकाराची असून पाण्याचा जलकुंभ एका टोकावर आहे. एकाच जलकुंभातून कान्हापूर, गोंदापूर व गणेशपूर या गावांना पाणीपुरवठा केला जातो. तिन्ही गावे तहानलेली आहेत.
पाण्यासाठी हातपंपावर रांगा लागलेल्या दिसतात. घरापासून लांब असलेल्या हातपंपावरून सायकलने पाणी आणावे लागत असून यात गृहिणींची चांगलीच फरपट होत आहे.
याच गटग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या गणेशपूरला तर एक वर्षापासून पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत नळ असूनही नळाला पाणी येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता पाचशे रुपये महिन्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्याचे पैसे मुख्याद्यापकाला खिशातून अदा करावे लागत आहे. प्रशासनाने पाणीसमस्या सोडवावी, अशी मागणी आहे.
म्हणे, प्रस्ताव अप्राप्त!
वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव जुलै २०१८ मध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला होता, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे तर पाणीपुरवठा विभाग म्हणतो प्रस्ताव अप्राप्त आहे. त्यामुळे कुणाचे खरे, हे कळायला मार्ग नाही.
शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी पाहिजे, शिवाय शौचालयात वापरासाठी पाण्याची गरज आहे. पाणीपुरवठा ग्रामपंचायतीची नैतिक जबाबदारी ठरते, पण पाणी पुरवठा होत नसल्याने एक वर्षापासून पाचशे रुपये महिन्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे.
- गौतम सोनटक्के, मुख्याध्यापक जि.प.शाळा कान्हापूर.