सौर उपसा सिंचनद्वारे पडिक जमीन आली सिंचनाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:03 AM2019-03-11T00:03:10+5:302019-03-11T00:04:18+5:30
तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची कल्पक बुद्धी व चीनचे राजदूत यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच युनान अक्षय ऊर्जा कंपनीलिमिटेड, चीन यांच्या सहाय्याने आर्वी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले)े आणि बोथली (नटाळा) येथे सौर ऊर्जावर चालणारा उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची कल्पक बुद्धी व चीनचे राजदूत यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच युनान अक्षय ऊर्जा कंपनीलिमिटेड, चीन यांच्या सहाय्याने आर्वी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले)े आणि बोथली (नटाळा) येथे सौर ऊर्जावर चालणारा उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सदर दोन्ही गावांच्या शेजारी असलेली पडिक जमीन सिंचनाखाली आली असून सदर प्रकल्प तेथील शेतकऱ्यांसाठी समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी फायद्याचा ठरत आहे. इतकेच नव्हे तर या प्रकल्पाचा व्याप अजून वाढविण्याच्या कामाला प्रशाकीय मान्यता मिळालीही आहे.
येथे पाण्याचा उपसा करण्यासाठी २७ एचपीची मोटार बसविण्यात आली आहे. ही मोटार सौर उर्जेवर चालत असून वीज निर्मितीसाठी १३२ सौर प्लेटस् बसवण्यात आल्या आहेत. प्रत्येकी २३५ वॅट प्रमाणे अंदाजित ३० किलोवॅट विद्युत निर्मिती केली जाते. सुकळी लघुसिंचन तलावातून पाण्याचा उपसा करून मुख्य टाकीमध्ये घेतले जाते. त्यानंतर बंद नलिकेतून उप टाकी व्दारे पुन्हा लाभ क्षेत्रातील शेतामध्ये आणले जाते. प्रत्येक उपसा सिंचन योजनेमध्ये वितरण व्यवस्थेसाठी ११० मि.मी. आणि ९० मि.मी.च्या बंद नलिका वापरण्यात आल्या आहे. प्रत्येक योजनेतून आज मितीस अंदाजित २५ हेक्टर संरक्षित सिंचनाची व्यवस्था केली गेली आहे. बंद नलिकेतून सर्व लाभ धारकांना समसमान पद्धतीने पाण्याचे वितरण होत असल्याने पारंपारिक वितरण व्यवस्थेच्या तुलनेत पाण्याची नासाडी अत्यंत नगण्य आहे. तसेच शेतीकरिता लागणाऱ्या पाण्याचे शेतकºयाकडून व्यवस्थापन होत आहे.
९० लाखांचे मिळाले सहकार्य
सदर प्रकलाच्या निर्मितीसाठी युनान अक्षय ऊर्जा कंपनी लिमिटेड, चीनद्वारे ९० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तर २० लााखांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून देण्यात आला असून सध्या एकूण ८० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १६ जानेवारीला या प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासाठी तसेच आणखी शेतकऱ्यांची शेतजमीन सिंचनाखाली आणण्याच्या उद्देशाने २१.२२ लाखांचा निधी देण्याच्या विषयाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीतून होणाºया कामांमुळे आखणी सुमारे चाळीस हेक्टरवरील शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकल्पामुळे बोथली (नटाळा) व पिंपळगाव (भोसले) भागातील मोठ्या प्रमाणात पडिक असलेली शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सौर उर्जेवर आधारित उपसा सिंचन योजना फलदायी ठरणारी आहे.
- दीपक लांडगे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, आर्वी.