जिल्ह्यातील १७ ग्रा.पं.मधील पाणी पिण्यास अयोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:14 AM2018-09-08T00:14:54+5:302018-09-08T00:15:30+5:30
पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाणी पिल्यामुळे सर्वाधिक राथरोगांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील ५१४ ग्रा. पं. पैकी ४९७ गावांमधील पाणी पिण्यायोग्य असल्याचे जि.प.च्या एका सर्वेक्षणात पुढे आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाणी पिल्यामुळे सर्वाधिक राथरोगांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील ५१४ ग्रा. पं. पैकी ४९७ गावांमधील पाणी पिण्यायोग्य असल्याचे जि.प.च्या एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. इतकेच नव्हे तर १७ गावांमधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना अस्वच्छतेचा विळखा असल्याचे या पाहणीत पुढे आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे निरोगी आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेवून त्या-त्या ग्रा.पं. प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात ७४ ग्रा.पं., देवळीमध्ये ६३, सेलू ६२, आर्वी ६९, आष्टी ४१, कारंजा (घा.) ५९, हिंगणघाट ७६ तर समुद्रपूर तालुक्यात ७० ग्रा. पं. आहेत. या ५१४ ग्रा. पं. मध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे एकूण २ हजार ८८६ स्त्रोत आहेत. या स्त्रातातील पाणी त्या-त्या गावातील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात. ज्या स्त्रोताचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात त्या स्त्राताच्या परिसरात अस्वच्छता नसने क्रमप्राप्त आहे; पण सध्यास्थितीत जिल्ह्यातील एकूण १७ ग्रामपंचायतीतील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना अस्वच्छतेचा विळखा आहे. यात देवळी तालुक्यातील पाच, सेल पाच, आर्वी सहा तर आष्टी तालुक्यातील एका गावाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. सदर गावांमधील लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देत तात्काळ योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. तर नागरिकांनीही पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी उकळून थंड करूनच तसचे चाळून पिणे गरजेचे आहे.
१७ ग्रा.पं.तील पाण्याच्या स्त्रोतांना ग्रिनकार्ड
जिल्ह्यातील ३४ ग्रामपंचायतीतील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या आवारात अस्वच्छता दिसून असल्याने जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाने त्या पाण्याच्या स्त्रोताबाबत संबंधित ग्रा.पं.ना पिवळे कार्ड दिले होते. त्यानंतर जि.प. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांना केंद्रस्थानी ठेवून सदर ग्रा.पं.तील काही ग्रा.पं.नी योग्य उपाययोजना केल्याने त्यापैकी १७ ग्रा.पं.ना ग्रिन कार्ड देण्यात आले आहे.
मनुष्याच्या शरीरात ६० टक्के पाणीच
पृथ्वी तलावरील केवळ ३ टक्केच पाणी पिण्यायोग्य आहे. इतकेच नव्हे तर मनुष्याच्या शरीर वजनाच्या ६० टक्के वजन हे पाण्याचे असते. पेशी जीवंत ठेवणे, शरीरातील द्रव्य पदार्थांचे वहन, अन्नाचे चयपचाय, शरीराचे तापमान थंड ठेवणे, उत्सर्जन ही पाण्याची प्रमुख कार्ये असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात रोगजंतू, पाण्याला दुर्गंधी तसेच रसायनिक प्रदुषक नसावे, असेही सांगण्यात आले.