बालविजेत्यांना ‘जंगल सफारी तथा रानवाचन’चा अनोखा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:24 AM2018-02-07T00:24:46+5:302018-02-07T00:24:58+5:30
बहार नेचर फाऊंडेशनतर्फे पक्षी सप्ताहात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील विजेत्यांना नाविण्यपूर्ण बक्षिसांतर्गत बोर व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी घडवून वन्यजीव निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बहार नेचर फाऊंडेशनतर्फे पक्षी सप्ताहात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील विजेत्यांना नाविण्यपूर्ण बक्षिसांतर्गत बोर व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी घडवून वन्यजीव निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बहारद्वारे पक्षी सप्ताहानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. 'मी पाहिलेला व मला आवडलेला पक्षी' विषयावर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी एकूण ३०० विद्यार्थ्यांमधून दीक्षा गंगाधर ढोणे केसरीमल कन्या शाळा, नादीया फिरोज खा पठाण गर्ल्स हायस्कूल आंजी, प्रणाली किशोर जोगे यशवंत हायस्कूल वायगाव, साहिल आकाश माटे जिजामाता विद्यालय, देवयानी गजानन बावणे बाबूराव बांगडे विद्यालय पवनार व पियूष साव सावित्रीबाई फुले विद्यालय वर्धा या सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. बालचित्रकारांना जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधतेची ओळख करून देण्याकरिता बोर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच पक्षी निरीक्षण व बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख करून देण्यात आली. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सभा कक्षात आयोजित कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी तळवेकर, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सचिव दिलीप वीरखडे यांनी बहार नेचर फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. यवतमाळच्या प्रयास ग्रुपचे डॉ. विजय कावलकर, अश्विन सव्वालाखे यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. यात विजेत्यांसह जयंत सबाने, आशिष पोहाणे, डॉ. जयंत वाघ, दीपक गुढेकर, दिलीप वीरखडे, डॉ. सायली इंगळे, दर्शन दुधाने, पार्थ वीरखडे, नम्रता सबाने, पवन दरणे आदी सहभागी झाले. बोर व्याघ्रचे सहा. वनसंरक्षक बोबडे, उपवन संरक्षक दिगंबर पगार, हिंगणीचे आरएफओ वाढे यांच्या सहकार्याने सफारी पार पडली.