पारपत्र सेवा केंद्राची वर्धेला अनोखी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 11:27 AM2018-03-01T11:27:37+5:302018-03-01T11:27:45+5:30
माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे सदस्य म्हणून टपाल विभाग आणि विदेश मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने परदेशवारीसाठी आवश्यक पारपत्र सेवा केंद्राची अनोखी भेट आज वर्धेकरांना देता आली, याचा मनस्वी आनंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे सदस्य म्हणून टपाल विभाग आणि विदेश मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने परदेशवारीसाठी आवश्यक पारपत्र सेवा केंद्राची अनोखी भेट आज वर्धेकरांना देता आली, याचा मनस्वी आनंद आहे. या केंद्राचा लाभ जिल्ह्यातील परदेशी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसोबतच हज यात्रेस जाणाऱ्या मुस्लीम बांधवांना होणार आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
मुख्य डाकघर येथे आयोजित पोस्ट आॅफिस पारपत्र सेवा केंद्राचे उद्घाटन बुधवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला हिंदी विद्यापीठाचे प्रकुलगुरू आनंदवर्धन शर्मा, नागपूर विभागाचे महापोस्टमास्टर मरिअम्मा थॉमस, क्षेत्रीय पारपत्र अधिकारी सी. एल. गौतम, नगराध्यक्ष अतुल तराळे उपस्थित होते.
खा. तडस पुढे म्हणाले की, ऐतिहासिक दृष्ट्या सबळ असताना वर्धा जिल्हा विकासात मागे राहतो; पण यावेळी पारपत्र सेवा केंद्र मिळविण्यात वर्धा जिल्ह्याने बाजी मारली आहे. यामुळे पारपत्र मिळविण्यासाठी नागपूरला ये-जा करण्याचा लोकांचा त्रास कमी होईल. याचबरोबर आता प्रत्येक गावात ग्रा.पं. कार्यालयात टपाल कार्यालय सुरू करण्यात येईल.
थॉमस यांनी टपाल कार्यालय हे केवळ पत्र पोहोचविण्याचे कार्यालय राहिले नसून ते आता जनसेवा केंद्र झाले आहे. लवकरच अटल पेन्शन योजना, आधार अपडेशन आणि इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर योजना पोस्ट आॅफीसमध्ये सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
देशात केवळ ८० पारपत्र सेवा केंद्र सुरू
देशात आतापर्यंत केवळ ८० पारपत्र सेवा केंद्र सुरू होते. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत होता. २४ जून २०१७ रोजी विदेशी मंत्र्यांनी टपाल कार्यालयाला जोडून पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून आज देशात टपाल कार्यालयाच्या समन्वयाने २५१ केंद्र सुरू होत आहेत. यात राज्यातील वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. अर्जदाराने पारपत्र काढण्यासाठी आॅनलाईन अर्ज पासपोर्ट इंडियाच्या संकेतस्थळावर सादर करावा. यानंतर अर्जदाराला त्याच्या मोबाईलवर अपॉइन्टमेंटसाठी वेळ कळविला जाईल. सादर केलेली कागदपत्रे व पोलीस चारित्र्य पडताळणीसह फाईल नागपूर कार्यालयाला पाठविली जाईल. नागपूर कार्यालयातून पारपत्र बनून पोस्ट आॅफिसला मिळेल व नंतर ते अर्जदाराला पोस्टाने पाठविले जाईल. यासाठी पारपत्र विभागाच्या चार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.असे क्षेत्रीय पारपत्र अधिकारी गौतम यांनी सांगितले.