जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गटसचिवांचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 09:39 PM2018-07-19T21:39:35+5:302018-07-19T21:41:05+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या गटसचिवांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात वेतनाच्या मागणीसाठी गुरूवारी अनोखे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या गटसचिवांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात वेतनाच्या मागणीसाठी गुरूवारी अनोखे आंदोलन केले. यावेळी आंदोनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ थेट नागरिकांकडे सरळ हाताने मदत मागितली. सदर आंदोलनामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
सदर गटसचिवांना गत ४२ महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. वारंवार निवेदन देत पाठपुरावा केला असता जिल्हा प्रशासनातील अधिकारी मागण्यांच्या निवेदनाला केराची टोपलीच दाखवित आहेत. शिवाय समस्या निकाली काढण्याकडेही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील गटसचिवांनी कर्जमाफीचे काम करण्यासाठी आंदोलनादरम्यान नागरिकांकडे थेट सरळ हाताने मदत मागितली. या अनोख्या आंदोलनात गटसचिव महेंद्रसिंग ठाकूर, अनिल लोखंडे, सुनील साळुंके, जीतेंद्र तराळे, सुनील बुचे, दिनेश कोटेवार, संजय ठाकरे, गिरीष मोहरे, गजानन कुंबलकर, किशोर पिसाळकर, किशोर जिन्नेवार, दिलीप रेवतकर आदी सहभागी झाले होते.
वेतन देणार तरी केव्हा?
वेतनाच्या मागणीसाठी गटसचिवांनी यापूर्वी संबंधितांना निवेदन सादर केले. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण तसेच मुंडन आंदोलन केले; पण समस्या सुटली नाही. त्यामुळे गुरूवारी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेवूनतरी आता आम्हाला वेतन देणार काय? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी आंदोलनादरम्यान उपस्थित केला होता. आंदोलनानंतर संबंधित अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.