विद्यापीठ, स्वायत्त महाविद्यालयांनी नवे उपक्रम राबवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:13 AM2018-03-07T00:13:44+5:302018-03-07T00:13:44+5:30
वर्तमान युगातील विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये विकसीत करणाऱ्या अभ्यासक्रमाची गरज आहे. म्हणून कोणतेही विद्यापीठ आणि चांगले स्वायत्त महाविद्यालय हे केवळ पदवी प्रदान करण्याचे केंद्र....
ऑनलाईन लोकमत
वर्धा : वर्तमान युगातील विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये विकसीत करणाऱ्या अभ्यासक्रमाची गरज आहे. म्हणून कोणतेही विद्यापीठ आणि चांगले स्वायत्त महाविद्यालय हे केवळ पदवी प्रदान करण्याचे केंद्र न ठरता ते नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सुद्धा केंद्र झाले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.
शिक्षा मंडळ द्वारा संचालित अग्रणी स्वायत्त जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयात ‘नॅक मूल्यांकन व स्वायत्तता: मार्ग आणि मर्यादा’ या विषयावरील ‘इनरव्हेट-२०१८’ या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षा मंडळचे सभापती संजय भार्गव होते. यावेळी मंचावर मानव संसाधन विकास मंत्रालय तसेच सिमाकॅस (इंटरनॅशनल लर्निंग सेंटर) उच्च शिक्षण, मुंबई येथील सल्लागार डॉ. अपूर्वा पालकर यांची उपस्थिती होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. निरज खटी, बेंगलूर येथील उपसल्लागार डॉ. गणेश हेगडे, के.जे. सोमय्या विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, मुंबईचे प्राचार्य डॉ. विजय जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओम महोदय व कार्यक्रम सचिव डॉ. संजीव झाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, ‘स्वायत्तता कोणत्याही संस्थांना स्वतंत्र होण्याचे सामर्थ्य प्रदान करते. यामध्ये उच्च गुणवत्ता टिकविण्यासाठी चौफेर कामगिरी करण्याची गरज असते. उच्च विद्याविभूषित शिक्षकांद्वारे रोजगाराभिमुख विद्यार्थी घडला पाहिजे’. कार्यक्रमात डॉ. खटी, डॉ. गणेश हेगडे, डॉ. जोशी यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय भार्गव यांनी सर्वांनी सुविधेपेक्षा सत्याकडे निरपेक्ष पद्धतीने पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. ओम महोदय यांनी सर्व तज्ञांचे स्वागत करून मूल्यांकन व स्वायत्तता: मार्ग आणि मर्यादा या विषयावरील विचार मंथना विषयी समाधान व्यक्त केले.
प्रास्ताविक कार्यक्रम सचिव डॉ. संजीव झाडे यांनी केले. संचालन डॉ. परवेझ सौदागर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. नीता मोहबंशी यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यातील विविध महाविद्यालयाच्या प्राचार्यासह शिक्षा मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयातील शिक्षक यांची उपस्थिती होती.