वर्ध्यात लवकरच गांधी विचारांचे विद्यापीठ; सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 02:14 PM2018-04-12T14:14:09+5:302018-04-12T14:14:38+5:30
तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुटीर उद्योग, लघु उद्योग व ग्रामोद्योग अशी संकल्पना असलेले आणि महात्मा गांधी यांना अपेक्षीत असलेले शिक्षण देणारे विद्यापीठ उभे करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाचे पालकमंत्री व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुटीर उद्योग, लघु उद्योग व ग्रामोद्योग अशी संकल्पना असलेले आणि महात्मा गांधी यांना अपेक्षीत असलेले शिक्षण देणारे विद्यापीठ उभे करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाचे पालकमंत्री व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जुनापाणी चौक पिपरी (मेघे) ते शिवाजी चौकपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण व मजबूतीकरण तसेच सौंदर्यीकरणाच्या कामाच्या भूमीपूजन प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आ. डॉ. पंकज भोयर, पिपरी (मेघे)चे सरपंच अजय गौळकार भाजपा महिला आघाडीच्या अर्चना वानखेडे, माजी जि.प. सदस्य अविनाश देव, भाजपा किसान मोचार्चे संजय इंगळे तिगावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, वर्धा शहराच्या शेजारी असलेल्या परिसराचाही विकास व्हावा या हेतूने आपल्याकडे आ. भोयर यांनी सदर रस्त्याच्या सिमेंटीकरणाची मागणी केली होती. या रस्त्याच्या सिमेंटीकरणासह मजबूतीकरण व सौंदर्यीकरणासाठी ३५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यमान सरकारला साडेतीन वर्ष पूर्ण झाले. परंतु, अद्यापही नागरिकांचे सर्वच प्रश्न सुटले असे म्हणता येणार नाही. काही प्रश्न सोडविताना काही अडचणीही येतात. जिल्ह्यात लवकरच २६६ कोटींचा सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून विविध विकास कामे, ६ कोटींचे बस स्थानक आदी पूर्णत्त्वास जाईल. एकूणच वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही पूर्ण शक्तीने काम करीत आहो, असेही याप्रसंगी त्यांनी सांगितले. यावेळी आ. डॉ. पंकज भोयर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पी फॉर पिपरी
शेतकऱ्यांसह समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी हे सरकार काम करीत आहे. महाराष्ट्राचा विकास करताना पूर्वी पी फॉर पुण्याचा पहिले तर पी फॉर पिपरी(मेघे) अशा ग्रामीण भागाचा नंतर विचार होत होता. परंतु, आता ज्या प्रमाणे पी फॉर पुणे विकसित होत आहे त्याच प्रमाणे पी फॉर पिपरीचाही विकास होईल, अशी ग्वाहीही याप्रसंगी ना. मुनगंटीवार यांनी दिली.