विनापरवाना लाकूड भरलेला ट्रॅक्टर जप्त
By admin | Published: May 15, 2017 12:31 AM2017-05-15T00:31:48+5:302017-05-15T00:31:48+5:30
वानरविहीरा शिवारातून लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वनविभागाने पकडला. त्यावर सायंकाळपर्यंत काहीच कारवाई करण्यात आली नव्हती.
वनविभागाची कारवाई : अवैध लाकूड कटाईची चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : वानरविहीरा शिवारातून लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वनविभागाने पकडला. त्यावर सायंकाळपर्यंत काहीच कारवाई करण्यात आली नव्हती. या ेट्रॅक्टरवर वनविभागाकडून काय कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमएच ३२ ए ८३६६ क्रमांकाचा ट्रॅक्टर वानरविहिरा गावानजीक रविवारी दुपारी १२ वाजता आडजात लाकडे घेवून जात असल्याचे क्षेत्रसहाय्यक गणेश कावळे यांच्या लक्षात आले. त्यांनी या ट्रॅक्टरला अडविले. या वाहनातील लाकडांची चौकशी केली असता ट्रॅक्टर मालकाजवळ परवानाच नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर ट्रॅक्टर हिंगणी येथील वनविभाग कार्यालयात आणण्यात आले. यावेळी चालक कवडू हरिश्चंद्र ढाकरे रा. धानोली (मेघे) यांनी ट्रॅक्टर हमीद अन्सारी यांच्या मालकीचा असून यात बंटी दुबे यांच्या मालकीची लाकडे असल्याचे सांगितले.
गत काही दिवसांपासून या मार्गाने अवैध लाकूड वाहतूक होत असल्याचे अनेकांकडून बोलले जात होते. यात आज वनविभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमळे यावर हे सत्य असल्याचे दिसून आले. शिवाय आजच्या कारवाईने यावर वचक बसेल, अशी चर्चा आहे. मात्र या भागात अवैधरीत्या लाकूड कटाई केली जात असल्याची चर्चाही जोरात आहे. हा सर्व प्रकार राजकीय वजनाखाली होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. सुटीच्या दिवशी ही कारवाई वनविभाग क्षेत्रसहाय्यक कावळे, सुनील कोडजावरे, मनोहर देशमुख यांनी केली.