अवकाळीचा कहर, गारपिटीने जनावरांचा मृत्यू; देवळी तालुक्यामध्ये ४० खांब लोळले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 12:35 PM2023-04-28T12:35:20+5:302023-04-28T12:36:49+5:30
दोन बैलजोड्यांसह ६१ मेंढ्या गतप्राण, झाडे कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित
वर्धा : जिल्ह्यात कडक उन्ह तापत असतानाच अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण व वादळी पावसाची ये-जा सुरू आहे. अशातच बुधवारच्या रात्रीला जिल्ह्यातील देवळी, आर्वी, समुद्रपूर, सेलू व वर्धा यासह इतरही तालुक्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात हजेरी लावत दाणादाण केली आहे.
विजेच्या कडकडाटासह वादळीपाऊस बरसल्याने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. यात वीज पडल्याने सेलू तालुक्यातील गोदापूर आणि समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील दोन बैलजोड्या गतप्राण झाल्या. तसेच देवळी तालुक्यातील आंजी (अंदोरी) येथे विजेमुळे शेतात असलेल्या ६१ मेंढ्या ठार झाल्या. यासोबतच विद्युत खांब वाकल्याने अंधारातच रात्र काढावी लागली. मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने वाहतूकही खोळंबली होती तर घरावरील टिनपत्रे उडाल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. या अवकाळी पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
बैलजोडी दगावल्याने दीड लाखांचे नुकसान
समुद्रपूर तालुक्यातील जाम चौरस्ता येथील फकीरवाडी शिवारात बुधवारी रात्रीच्या सुमारास वीज पडल्याने बैलजोडी ठार झाली. यात शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले असून, ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सुनील वसंता सराटे यांची फकीरवाडी शिवारातील शेतामध्ये झाडाखाली बैलजोडी बांधून होती. बुधवारी रात्रीला मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. अशातच वीज पडल्याने बैलजोडी दगावली. गुरुवारी सकाळी शेतात गेल्यानंतर बैलजोडी मृतावस्थेत दिसून आली. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
चिखलीत झाड पडल्याने बत्ती गुल
चिकणी गावासह परिसरामध्ये बुधवारी रात्री अवकाळी पावसाने चांगलाच कहर केला. विजांच्या कडकडाटासह वादळाने चांगलीच दाणादाण झाली होती. अशातच चिखली येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये अविनाश बिरे व गजानन डायरे यांच्या घराजवळील झाड विद्युत तारांवर पडल्याने रात्रभर गावातील बत्ती गुल होती. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. बराच वेळ चाललेल्या या वादळ व विजेच्या कडकडाटाने सारेच भयभीत झाले होते. विद्युत तारांवर झाड पडल्यानंतर तत्काळ विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
गोंदापुरात वीज कोसळून बैलजोडी ठार
कडुनिंबाच्या झाडाखाली बांधून असलेल्या बैलजोडीवर वीज पडल्याने दोन्ही बैल जागीच गतप्राण झाले. ही घटना गोंदापूर शेतशिवारात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे जवळपास ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले. रेहकी येथील शेतकरी सतीश नामदेवराव शिंदे यांची समृद्धी महामार्गालगत गोंदापूर शिवारात शेती आहे. बुधवारला सायंकाळच्या सुमारास त्यांच्या सालगड्याने बैलजोडी कडुनिंबाच्या झाडाखाली बांधून ठेवली होती. रात्री बारा वाजताच्या सुमारास अवकाळी पावसादरम्यान विजांचाही कडकडाट सुरू झाला. यावेळी बैलजोडीवर वीज पडल्याने ती जागीच गतप्राण झाली. गुरुवारी सकाळी सालगडी शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच तलाठ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.
आर्वीत वादळी पावसाने उडविली नागरिकांची त्रेधातिरपीट
बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने आर्वीकरांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली होती. घरावरील टीनाच्या छतासह फलकही उडाले. झाडांच्या फांद्या तुटून विद्युत तारांवर पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.
आर्वी शहरातील देऊळकर लेआउट येथील प्रवीण उत्तमसिंग चव्हाण यांच्या घरावरील १६ फुटांचे सहा टीनपत्रे अँगलसह उडाले आणि संभाजीनगरात राहणाऱ्या प्राचार्य साहेबराव अवथळे यांच्या घरावरून गेलेल्या विद्युत तारांना अडकले. त्या घरी खाली तीन ते चार मुले खेळत होती. परंतु टीनपत्रे तारांना अडकल्याने मोठा अनर्थ टळला. यात प्रवीण चव्हाण यांचे ४० हजारांचे नुकसान झाले. या वादळाने संभाजीनगर, संतोषी माता मंदिर परिसर, शिरपूर रोड, कन्नमवारनगर, अंतरडोह पुनर्वसन, आर्वी-तळेगाव मार्गावरील विद्युत तारा तुटल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला होता. संभाजीनगरात तसेच इतर ठिकाणी तीन-चार झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने छोटू महेश कडू, विनोद पारधी, सचिन गोडबोले, अक्षय हिवाळे व अरविंद सतीमेश्राम आदींनी नागरिकांना अंधाराचा त्रास होऊ नये, यासाठी तातडीने जम्पर, तारा तुटलेल्या तारा व्यवस्थित करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
विद्युत खांब जमिनदोस्त, देवळी तालुका अंधारात
देवळी तालुक्यातील अडेगाव, दापोरी, कोल्हापूर (सिंगरवाडी), आंजी, अंदोरी, चिखली, पिंपळगाव (लुटे), गौळ तसेच परिसरतील गावाला वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला. काही गावात गारपीटही झाल्याने उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती. विद्युत विभागाचे ट्रान्सफॉर्मर, तसेच ४० खांब जमीनदोस्त होऊन १५ लाखांचे नुकसान झाले. बुधवारच्या रात्री दहा वाजताच्या दरम्यान तालुक्यात हा कहर अनुभवायला आला.
बुधवारी सायंकाळी देवळी व परिसरातील गावात वादळी पावसाला सुरुवात झाली. काहीवेळासाठी उसंत दिल्यानंतर साडेनऊ ते दहा वाजेदरम्यान काही गावांना वादळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले. यादरम्यान वीज पडल्याने अंदोरी येथील राजू डगवार यांच्या शेतात बसविलेल्या मेंढ्यांच्या कळपातील ६१ मेंढ्या गतप्राण झाल्या. तसेच अडेगाव, गौळ, कोल्हापूर (सिंगरवाडी) आदी गावात झाडे पडली. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचारासाठी परिसरात फिरणारी वाहने अडकून पडली. यातील काही वाहने जेसीबीच्या सहाय्याने काढण्यासाठी रात्री ३ वाजेपर्यंत कसरत करावी लागली. कोल्हापुरातील विद्युत विभागाचे ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चरसह खाली पडले. तसेच ११ केव्हीचे १२ खांब तुटून पडले. भिडी व गिरोली भागात शेतातील पंपाची एलटी वाहिनी तुटून पडली. यासोबतच ३८ खांब जमिनदोस्त झाले. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. मागील दोन दिवसांपासून या भागात वादळी पाऊस सुरू आहे. यामध्ये शेतातील उन्हाळी सोयाबीन, तीळ तसेच फळभाज्यांचे पीक मातीमोल झाले आहे.