‘युपीएचसी’ला पालिकेच्या अनास्थेचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 01:02 AM2017-08-06T01:02:44+5:302017-08-06T01:03:39+5:30
शहरी भागातील नागरिकांकरिता उभारण्यात आलेले वर्धेसह हिंगणघाट येथील शहरी प्राथमिक केंद्र पालिकेच्या अनास्थेचे बळी ठरत असल्याचे दिसून आले आहे.
रूपेश खैरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरी भागातील नागरिकांकरिता उभारण्यात आलेले वर्धेसह हिंगणघाट येथील शहरी प्राथमिक केंद्र पालिकेच्या अनास्थेचे बळी ठरत असल्याचे दिसून आले आहे. तब्बल सव्वा कोटी रुपये खर्चून उभारलेल्या केंद्राच्या इमारती तयार असून आरोग्य सेवा पुरविण्यात त्या कुचकामी ठरत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी भागातील नागरिकांना त्यांच्याच परिसरात आरोग्य सुविधा मिळावी म्हणून लोकसंख्येच्या आधारावर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार वर्धा शहरात पुलफैल आणि सानेवाडी या मागास भागाची निवड करण्यात आली. तर हिंगणघाट येथे दोन केंद्र देण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र शहरी भागात असल्याने त्यांची सर्वस्वी जबाबदारी पालिकेवर देण्यात आली. मात्र पालिकेच्या अनागोंदीमुळे शासनाची ही योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात येत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होवून त्यांना त्यांच्याच भागात सेवा मिळण्याचा उद्देश येथे दुर्लक्षित झाल्याचे दिसते. यामुळे याकडे पालिकेने लक्ष देत शासनाचा मुख्य उद्देश पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
शासनाच्या सूचनेनुसार वर्धा व हिंगणघाट येथे प्रत्येकी दोन असे चार शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. केंद्र पालिकेच्या हद्दीत असल्याने त्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. याला चार वर्षांचा कालावधी झाला असून त्याचा कुठलाही वापर होताना दिसत नाही. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष पुरवून तशा सूचना पालिकेला देण्याची गरज आहे.
- डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.
दोन वर्षानंतर पदभरती
प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्यानंतर येथे लागणाºया कर्मचाºयांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. त्याची परवानगी पूर्वीच मिळाली असली तरी त्याकरिता आता मुलाखती घेण्यात येत आहे.
सामान्य रुग्णालयातील ११ परिचारीका पालिकेत
शहरी नागरिकांकरिता असलेल्या या युपीएचसीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील ११ परिचारीका दिल्या आहेत. वेतन पालिकेच्या माध्यमातून सुरू असून त्यांची सेवा मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे.
इमारतीचा अवैध कामांकरिता वापर ?
पुलफैल भागात असलेल्या इमारतीच्या पाºयांवर अस्वच्छता पसरली असून या इमारतीचा वापर अवैध कामांकरिता होत असल्याचा संशय बळावत आहे.
शहरी आरोग्य केंद्रांकरिता वैद्यकीय अधिकाºयांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र सेवेत येण्यास कोणीच तयार नसल्याचे दिसून आले. या केंद्रात सेवा देण्यास कोणी तयार असल्यास त्याच्या अर्जावरच त्याची नियुक्ती करण्यात येईल. इतर कर्मचाºयांची निवड झाली आहे. अधिकारी मिळताच केंद्राची सेवा सुरू होईल.
- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, नगर परिषद वर्धा.