रेड झोनमधून येण्याकरिता रुग्णवाहिकेचा वापर; वर्धा प्रशासनासमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:58 PM2020-04-27T17:58:48+5:302020-04-27T17:59:16+5:30
कोरोनाच्या संक्रमणामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांचा गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पण, गावाकडे जाण्याची लागलेली ओढ काही स्वस्थ बसू देत नाही. पोलीसांनी त्यांनाही हेरुन कारवाईचा बडगा उगारल्याने आता रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेफ प्रवास करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वधार् : कोरोनाच्या संक्रमणामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांचा गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पण, गावाकडे जाण्याची लागलेली ओढ काही स्वस्थ बसू देत नाही. काहींनी टँकर किंवा ट्रेलरमध्ये बसून गावाचा रस्ता धरला. पोलीसांनी त्यांनाही हेरुन कारवाईचा बडगा उगारल्याने आता रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेफ प्रवास करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. यामुळे ग्रीन झोन मधील जिल्हा प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
वर्धा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या महिनाभरानंतर सुद्धा कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. आताही रुग्ण आढळू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून अप-डाऊन करणाऱ्या शासकीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रोख लावण्यात आला आहे. रुग्णवाहिकेतून प्रवास केला तर तपासणी नाक्यावर वाहन अडविले जात नाही. हीच बाब लक्षात घेऊन नागपूर या कोरोनाबाधित जिल्ह्यातून दोन रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तीन व्यक्ती वर्धा जिल्ह्यात दाखल झाले. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली आहे. एम. एच. २९ टी. आय. १०२८ क्रमांकाची रुग्णवाहिका वध्यार्तून नागपुरला गेली होती. परत येताना चालकाने नागपुरातील सतरंजीपुरा येथील एका महिलेला वर्ध्यात आणले. याची माहिती प्रशासनाला मिळताच वैद्यकीय अधिकाºयांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी रुग्णवाहिका जप्त केली. तसेच आलेल्या महिलेसह ज्यांच्याकडे ती राहायला आली होती तो घरमालक आणि रुग्णवाहिकेचा चालक व मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. खबरदारी म्हणून चालक, महिला व घरमालकाच्या परिवाराला क्वारंटाईन करण्यात आले. अशाच प्रकारे शनिवारी सकाळी नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा येथून एम. एच. ३२ अे.जे.२३३४ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून दोन व्यक्ती पुलगावात दाखल झाले. याची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाºयांच्या तक्रारीवरुन आलेल्या दोघांसह गुंजखेडा येथील रुग्णवाहिकेच्या चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सतत दोन घटना उघडकीस आल्याने आता जिल्ह्याच्या सीमेवर रुग्णवाहिकांचीही तपासणी केली जात आहे.
वर्ध्यातला पाहुणचारही महागात पडणार
वर्ध्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कठोर अंमलबजाणी केली जात आहे. आता काही कार्यक्रमानिमित्त कोरोनाबाधित जिल्ह्यातून कुणी पाहुणा वर्ध्यात दाखल झाला तर त्याच्यासह परिवारातील सदस्यांनाही क्वारंटाईन करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात वध्यार्तील पाहुनपणा चांगलाच महागात पडणार आहे. त्यामुळे पाहुण्यांनी आता वर्ध्यापासून दूर राहिलेलेच बरे.