शिक्षणाचा उपयोग सामान्यांसाठी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:24 PM2018-01-04T22:24:21+5:302018-01-04T22:24:32+5:30
चिकित्साशास्त्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातून संपादित केलेले ज्ञान, संशोधनकार्य आणि व्यवसाय या माध्यमातून केवळ आर्थिक लाभ मिळविणे, एवढाच आपला मर्यादित उद्देश नसावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चिकित्साशास्त्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातून संपादित केलेले ज्ञान, संशोधनकार्य आणि व्यवसाय या माध्यमातून केवळ आर्थिक लाभ मिळविणे, एवढाच आपला मर्यादित उद्देश नसावा. सामाजिक ऋण म्हणून समाजातील शेवटच्या व गरजू माणसाच्या हितासाठी व्हावा, असे उद्गार दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
सावंगी (मेघे) येथे महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय आणि रवी नायर भौतिकोपचार महाविद्यालयात नव्याने प्रवेशित केलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
उद्घाटन समारोहाला मंचावर आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, भौतिकोपचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अथरूद्दीन काझी, शिक्षण संचालक मनीषा मेघे, आयुर्वेद महाविद्यालयाचे समन्वयक व्ही.आर. मेघे, पदव्युत्तर विभागाचे उपअधिष्ठाता डॉ. के.एस. आर. प्रसाद सचिव डॉ. अनिता वंजारी, डॉ. आशीष बेले यांची उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ. श्याम भुतडा यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता वंजारी यांनी केले. संचालन डॉ. लाजवंती लालवानी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. इर्शाद कुरेशी यांनी मानले. या तीन दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाची ओळख करून देतानाच डॉक्टर म्हणून पार पाडावयाची कर्तव्ये आणि जबाबदाºयांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.