आगीवर नियंत्रणासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 09:39 PM2019-03-11T21:39:52+5:302019-03-11T21:40:12+5:30
आगीच्या घटनांना वेळीच आळा घालता यावा याकरिता वनविभागाकडून हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र, जंगलाला आगीच्या घटना वगळता धुऱ्याला लागणाºया आगीच्या घटनांचेच प्रमाण अधिक असून याबाबतही मोबाईलवर संदेश प्राप्त होत असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आगीच्या घटनांना वेळीच आळा घालता यावा याकरिता वनविभागाकडून हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र, जंगलाला आगीच्या घटना वगळता धुऱ्याला लागणाऱ्या आगीच्या घटनांचेच प्रमाण अधिक असून याबाबतही मोबाईलवर संदेश प्राप्त होत असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्यात जंगलात आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भारतीय वनसंरक्षण संस्थेच्या माध्यमातून (फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडिया) वनविभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलची संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कुठेही आग लागताक्षणी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईलवर संदेश प्राप्त होतो, तसेच ई-मेलदेखील येतो. संदेश मिळताच संबंधित भाग, बिटातील अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवितात. १ जानेवारी २०१९ ते आतापावेतो जिल्ह्यात आगीच्या ४२ घटना घडल्यात. मात्र, यातील बहुतांश धुऱ्याला लागलेल्या आगीच्या घटना असून बोटावर मोजण्याइतपतच वणव्याच्या घटना आहेत.
सॅटेलाइटवरून केवळ आग लागल्याचे दर्शविले जाते. मात्र, धुरा की जंगलाला आग लागली हे कळू शकत नाही. त्यामुळे कुठेही आग लागताच वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना संदेश, ई-मेल प्राप्त होतो. अधिकारी, कर्मचारी धावपळ करीत घटनास्थळ गाठतात, यावेळी आग धुºयाची असल्याचे स्पष्ट होते.
वनविभागात नियंत्रण कक्ष
आगीच्या घटनांची नोंद घेण्याकरिता वनविभागाच्या वतीने ‘फॉरेस्ट जीआयएस’ हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. याकरिता कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या विभागात एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला असून पोर्टल दोनवेळा अपडेट होते. या पोर्टलच्या नकाशावर आग लागल्याचे ठिकाण विशिष्ट रंगाद्वारे दर्शविले जाते. तसेच बिटाकरिता प्रत्येकी एक याप्रमाणे १९० फायर ब्लोअर आहेत.
उन्हाळ्यात जंगल आणि शेतात आग लागण्याचे प्रमाण मोठे असते. या घटनांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोर्टल विकसित करण्यात आले असून १९२भ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांना घटना घडल्यास यावर संपर्क करावा.
-सुहास बढेकर, सहायक उपवनसंरक्षक, वनविभाग वर्धा.