मास्क वापरा अन् कोरोना विषाणू पळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:00 AM2020-10-18T05:00:00+5:302020-10-18T05:00:06+5:30
सध्या अनेकजण बेफिकीर झाल्याचे दिसते आहे. मास्कचा वापरच केला जात नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय मास्क घातला तरी तो हनुवटीवरच असलेला दिसून येतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी व्यवस्थित मास्क घालणे गरजेचे आहे. महसूल विभाग, पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर मास्कचा वापर केला जातो. ते अयोग्य आहे. आपला जीव वाचविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे उपाय वापरले पाहिजेत. मास्कच्या वापरासह वारंवार हात धुणे हाही प्रभावी उपाय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळत असल्याची चिन्हे असली तरी नागरिकांनी लगेच निर्धास्त होणे धोक्याचे आहे. कारण कोरोना संसर्गाचे संकट अजून कायम आहे. काळजी घेतली नाही तर ते पुन्हा वाढण्याचाही धोका आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर अनिवार्यच आहे. मास्क वापरा अन् कोरोना पळवा अशी मोहीमच आता वर्धेकरांनी सुरू करण्याची आवश्यकता आहे. मे मध्ये कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात उच्चांकी रुग्णसंख्या होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून वर्धेकरांनी थोडा दिलासा मिळतो आहे. जिल्हा प्रशासनाने मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. त्यातच पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही सुरू ठेवली आहे. त्यामुळे नागरिक मास्कचा वापर करीत आहेत. त्याचाही चांगला परिणाम दिसून येत आहे.
सध्या अनेकजण बेफिकीर झाल्याचे दिसते आहे. मास्कचा वापरच केला जात नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय मास्क घातला तरी तो हनुवटीवरच असलेला दिसून येतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी व्यवस्थित मास्क घालणे गरजेचे आहे. महसूल विभाग, पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर मास्कचा वापर केला जातो. ते अयोग्य आहे. आपला जीव वाचविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे उपाय वापरले पाहिजेत. मास्कच्या वापरासह वारंवार हात धुणे हाही प्रभावी उपाय आहे. बाहेरून आल्यानंतर, खरेदी केल्यानंतर, जेवणापूर्वी साबणाने हात धुणे अत्यावश्यक आहे.
वारंवार हात धुण्यानेही कोरोनाचा धोका टाळता येतो. रुग्णसंख्या कमी झाल्याचा दिलासा असला तरी अद्याप धोका आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वत:सह कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क न वापरणारे इतरांसाठीही धोकादायक ठरू शकतात. घरातील मुले, वृद्ध यांनाही मास्क न वापरणाऱ्यांकडून संसर्गाचा धोका अधिक आहे. निष्काळजीपणामुळे संसर्ग झाल्यास त्याचे दुरगामी दुष्पपरिणाम बाधित व्यक्तीला भोगावे लागणार आहेत.
कोरोना संसर्गाचे दुरगामी परिणाम
मास्क न वापरणे, वारंवार हात न धुणे यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यास रुग्णाला यातना सहन कराव्या लागतात. त्यातून बरे झाल्यानंतर त्या संसर्गाचे शरीरावर तसेच अवयवांवर दुरगामी दुष्परिणाम होतात. त्यामुळे मास्क वापरल्यास कोरोना विषाणू संक्रमणाचे संकट आपल्यापासून दूर ठेवण्यास मदत होणार, आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. मात्र, नागरिक गंभीर नसून त्यांना विसर पडल्याचे दिसून येते.
बोलताना मास्क अत्यावश्यक
अनेकजण केवळ गर्दीच्या ठिकाणीच मास्क वापरताना दिसतात. मात्र वैद्यकीय तज्ञांच्या मते घरातही मास्क वापरणे आवश्यक आहे. विशेषत: बोलताना तर मास्क अत्यावश्यक आहे, असेही मत त्यांचे आहे. जिल्ह्यात आता बऱ्यापैकी आस्थापना सुरू झाल्या आहेत. त्यातच सण तोंडावर असल्याने बाजारात गर्दीही होत आहे. त्त्यामुळे त्या काळात कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आताच व्यक्त केली जात आहे. त्त्यामुळे मोठ्या प्रमाणातील संसर्ग रोखण्यासाठी सदैव मास्क वापरणे हाच केवळ एक उपाय नागरिकांसमोर शिल्लक आहे.