ओलितासाठी आता ट्रॅक्टरचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:47 PM2017-11-21T23:47:02+5:302017-11-21T23:47:26+5:30
कृषीपंपाकरिता असलेले भारनियमनाचे वेळापत्रक शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. वारंवार मागणी करुनही यात बदल होत नसल्याने पिकांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी वेगळी शक्कल लढविली.
विजय माहुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : कृषीपंपाकरिता असलेले भारनियमनाचे वेळापत्रक शेतकºयांना त्रासदायक ठरत आहे. वारंवार मागणी करुनही यात बदल होत नसल्याने पिकांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी वेगळी शक्कल लढविली. घोराड येथे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचलित वीजनिर्मिती यंत्राचा वापर करून ओलित केले. यात वेळेची बचत होत असली तरी ओलिताचा खर्च मात्र वाढला आहे.
ट्रॅक्टरचलित यंत्रावर ५, ३, ७.५ ते २ अश्वशक्ती मर्यादा असलेले विद्युतपंप कार्य करतात. यावर ६० स्प्रींकलरचे नोझलने सिंचन करता येते. कमी वेळात जास्त ओलित करणे शक्य होत आहे. दिवसाला ३ ते ४ एकरातील ओलित येथील शेतकरी करू लागला आहे. याकरिता शेतकºयाला ५ हजार रूपये खर्च येतो. ज्या शेतकºयाकडे स्वत:च्या मालकीचा ट्रॅक्टर आहे त्याला दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो. हा सर्व खटाटोप करुन शेतकरी ओलित करीत असला तरी शेतकºयांना खर्च परवडणारा नाही.
भारनियमनाचे वेळापत्रक गैरसोयीचे आहे. रात्रीचे ओलीत करताना शेतकºयांना अडचण येते. कधी ब्रेकडाऊन तर कधी वीज पुरवठा खंडित होतो. वारंवार खंडित होणाºया वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. यामुळे ओलिताकरीता दिलेली मजुरी वाया जाते. एकीकडे मजुरीचे वाढलेले दर आणि भारनियमनातील अनियमितता यामुळे ओलिताकरिता हे यंत्र विकत घेतले, असे शेतकरी सांगतात.
पाण्याचा मुबलक साठा आवश्यक
या यंत्राद्वारे ओलित करताना विहिरीला पाण्याचा मुबलक साठा असणे आवश्यक आहे. ज्यामुळे जास्तीतजास्त ओलित करता येते. रस्त्यापासून विहीर, नाला, नदी दूर असली तरी ट्रॅक्टर दुरवर उभा ठेवून ओलित करणे शक्य आहे.
भारनियमनामुळे शेताचे ओलित करणे कठीण झाले. ट्रॅक्टर घरचाच होता. त्यावर वीजनिर्मिती यंत्र बसविले. याकरिता ८० ते ९० हजार रूपये खर्च आला. अशापद्धतीने पहिल्यांदाच ओलित केले. ते खर्चिक असले तरी वेळेची बचत व वेळेवर ओलित करणे शक्य झाले.
- विवेक धोंगडे, युवा शेतकरी, घोराड.