पाण्याचा काटकसरीने वापर करा

By Admin | Published: March 17, 2016 02:39 AM2016-03-17T02:39:07+5:302016-03-17T02:39:07+5:30

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रत्येकाने सामोरे यावे. जलजागृती सप्ताह हा शासनापुरता मर्यादित न राहता, व्यापक प्रमाणात लोकांचा सहभाग यामध्ये वाढावा.

Use water efficiently | पाण्याचा काटकसरीने वापर करा

पाण्याचा काटकसरीने वापर करा

googlenewsNext

आशुतोष सलील : जलदिंडी, नद्यांच्या जलपूजनाने जलजागृती सप्ताहास प्रारंभ
वर्धा : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी प्रत्येकाने सामोरे यावे. जलजागृती सप्ताह हा शासनापुरता मर्यादित न राहता, व्यापक प्रमाणात लोकांचा सहभाग यामध्ये वाढावा. लोकांनी या सप्ताहाचे महत्त्व ओळखून पाणी हेच जीवन आहे. त्याच्या वापराचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले.
जागतिक जलदिनानिमित्त आयोजित जलजागृती सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, राज्य जल व सिंचन आयोगाचे माजी सदस्य डॉ. उल्हास फडके, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. दत्तात्रय वने, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयवंत गवळी, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शंकर मंडवार, कार्यकारी अभियंता सु.ह. ढवळे, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित मेश्राम, निम्न वर्धा प्रकल्पाचे रब्बेवार, गहलोत आदी उपस्थित होते.
उद्घाटनपर कार्यक्रमात वर्धा, धाम, बोर, पंचधारा, पोथरा नदीच्या जलाचे पूजन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते करण्यात आले. जलप्रतिज्ञेचे सामूहिक वाचन व वर्धा सिंचन पुस्तिकेचे विमोचनही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी जानकीदेवी बजाज संस्थेच्या परिसरातून विकास भवनपर्यंत जलदिंडी काढण्यात आली. यात भजनी मंडळांचाही समावेश होता.
जिल्हाधिकारी सलील पूढे म्हणाले की, नदी, धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. बीड, लातूर आणि उर्वरित मराठवाड्यातील चिंतेची बाब असून प्रत्येक नागरिकाने पाण्याचा ताळेबंद समजावून घ्यावा. पाण्याचे महत्त्व ओळखावे. मोजून-मापून पाण्याचा वापर करावा. पाऊस संकलन, पुनर्भरण, नळावर मीटर बसविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. जलसंवर्धनासाठी सर्वांनीच पुढे येणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियान २०१ गावांत राबविण्यात येत आहे. पाणी वापराच्या योग्य नियोजनाबरोबरच पाटबंधारे विकास महामंडळाने प्रकल्पामुळे बाधित झालेल्यांना योग्य मोबदला देण्यासाठी कार्यवाही करावी. या प्रकल्प बाधितांबद्दल कृतज्ञ राहून त्यांच्या जागेचा योग्य मोबदला द्यावा, तरच या सप्ताहाची यशस्वीता अधिक प्रभावी राहील. जिल्ह्यातील तालुका पातळीवर पाण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात यावे. पाणी हेच जीवन असून प्रत्येकाने पाण्याची बचत, काटकसर करावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वातावरणातील बदल दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. सर्वांनी निसर्ग संवर्धनासह पाणी बचतीचा विचार करावा. पाणी अनमोल असून त्याच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रत्येकामध्ये पाणी वापराबाबत जागृती निर्माण करावी, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सुजलाम सुफलाम धरणी मातेसाठी पाणी अत्यावश्यक असून त्यावरच सृष्टीचा डोलारा उभा आहे. यामुळे प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले.
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी पाण्याचे महत्त्व विषद करणारी कविता सादर करून पाणी बचतीचा संदेश दिला. जलसंवर्धनासाठी तालुकास्तरावरही जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगून पाणी बचतीची लोकचळवळ उभी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही सांगितले.
यावेळी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक नितीन महाजन यांनीही विपरित भूपृष्ठाची स्थिती, भूशास्त्रीय स्थिती, भूजल नियमन कायदा, पावसाची अनियमितता, जनतेची मानसिकता, पावसाच्या पाण्याचे संकलन, नियोजन आणि व्यवस्थापन यावर सादरीकरण केले.
प्रारंभी जलप्रतिज्ञेने सर्वांनी जलसंवर्धनाचा संकल्प केला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते जलदेवता, जलकलशाचे पूजन करण्यात आले. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था व संस्थेचे कार्य, जलनियोजन याबाबत संस्थेचे विनेश काकडे यांनीही सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता जयवंत गवळी यांनी केजे. यात तयांनी जलजागृती सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा मांडली. याप्रसंगी विभागनिहाय सादरीकरणही करण्यात आले. पाणी बचत जनजागृती व चर्चासत्र यामध्ये पाणी संवर्धनावर विचारमंथन तसेच जलसंवर्धन संकल्प करून कार्यक्रमाचा समारोप झाला.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Use water efficiently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.