रस्ता रुंदीकरणात ‘वेस्ट मटेरियल’चा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:33 PM2019-03-26T23:33:23+5:302019-03-26T23:33:54+5:30
वर्धा ते हिंगणघाट मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या रस्ता बांधकामात कंत्राटदाराकडून मुरुमाऐवजी ‘वेस्ट मटेरियल’चा वापर केला जात आहे. तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या या बांधकामात कंत्राटदार आपले उखळ पांढरे करण्यासाठी सदोष बांधकाम करीत असून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारीही याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा ते हिंगणघाट मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या रस्ता बांधकामात कंत्राटदाराकडून मुरुमाऐवजी ‘वेस्ट मटेरियल’चा वापर केला जात आहे. तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या या बांधकामात कंत्राटदार आपले उखळ पांढरे करण्यासाठी सदोष बांधकाम करीत असून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारीही याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शासनाकडून कोट्यवधी रुपयांतून रस्त्याच्या कामांना गती दिली जात आहे. परंतु, कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे निकृष्ट बांधकामाचे किस्से पुढे येत आहे. वर्धा ते हिंगणघाटपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा कंत्राट साऊथमधील आरटीसी इन्फ्रास्ट्रक्चर नामक कंपनीला दिला आहे. या कामाचा जवळपास दीडशे रुपयांचा कंत्राट असल्याचे सांगण्यात आले. सध्या वायगाव ते वर्ध्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरण करताना मूळ रस्त्यालगत खोदकाम करून त्यात भर टाकली जात आहे.
यात मुरुम व गिट्टीचा वापर करणे आवश्यक असताना कंत्राटदाराकडून खोदकाम केलेल्या डांबरी रस्त्याच्या वेस्ट मटेरियलचा वापर केला जात आहे. सध्या वायगाव ते सेलू (काटे) दरम्यानच्या रस्त्याच्या कामात वेस्ट मटेरियल वापरल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे रस्ता किती काळ टिकणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्रास वेस्ट मटेरियलचा वापर होत असतानाही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व संबंधित यंत्रणेला हा प्रकार लक्षात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुरुमाचा नाममात्र वापर
काळी माती असली तर मुरुमापेक्षा जास्त चांगले मटेरियल वापरता येते, असे अधिकारी सांगतात. परंतु वायगाव ते सेलू (काटे) या मार्गावर काळी माती नसतानाही कंत्राटदाराकडून रस्त्याच्या बाजूने भर टाकण्याकरिता गिट्टी व मुरुमाऐवजी कुठल्यातरी डांबरी रस्त्याचे खोदून काढलेले वेस्ट मटेरियल वापरले जात आहे. विशेषत: ७५ टक्के वेस्ट मटेरियल तर २५ टक्के मुरुम वापरला जात आहे. गिट्टीऐवजी वेस्ट मटेरियलमधीलच गिट्टीचा वापर होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
वर्धा ते हिंगणघाट महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कन्सलटंट कंपनीला दिली आहे. त्याचे टिम लिडर चौकसे असून त्यांच्या नियंत्रणात हे काम सुरू आहे. काही अडचण असल्यास आमच्याकडून सहकार्य केले जाते. बांधकामात वेस्ट मटेरियल वापरणे चुकीचे असून त्याबाबत चौकसे यांच्याकडून माहिती घेतली जाईल.
- पी. बी. तुंडुलकर, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग.
हिंगणघाट ते वर्ध्यापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम साऊथमधील आरटीसी इन्फ्रास्ट्रक्चर नामक कंपनीला दिला. जवळपास दीडशे कोटी रुपयांतून या रस्त्याचे बांधकाम होणार आहे. रस्त्याच्या बांधकामात कंत्राटदाराकडून वेस्ट मटेरियलचा वापर केला जात असेल तर ते मटेरियल काढण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या जाईल.
- व्ही. के. चौकसे, टिम लिडर.