माणसांचे लसीकरण थांबले, अन् जनावरांचेही रखडले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 08:47 AM2021-05-18T08:47:22+5:302021-05-18T08:49:36+5:30

Wardha news तोंडखुरी, पायखुरी यासह इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर आणि मे महिन्यात लसीकरण केले जाते. मात्र, लसीचा पुरवठाच झालेला नसल्याने जनावरांचे लसीकरणही रखडले आहे.

Vaccination of human beings has stopped, even animals have stopped ...! | माणसांचे लसीकरण थांबले, अन् जनावरांचेही रखडले...!

माणसांचे लसीकरण थांबले, अन् जनावरांचेही रखडले...!

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा परिणामपशुसंवर्धन विभागाला अद्याप लसीचा पुरवठा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : माणसांंना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण लांबलेले असतानाच जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. तोंडखुरी, पायखुरी यासह इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी जनावरांना दरवर्षी नोव्हेंबर आणि मे महिन्यात लसीकरण केले जाते. मात्र, लसीचा पुरवठाच झालेला नसल्याने जनावरांचे लसीकरणही रखडले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाने मागील वर्षापासून जिल्ह्यात कहर केला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यूसंख्याही दररोज नवा उच्चांक गाठत आहे. गतवर्षी मानवावर कोरोनाचे, तर जनावरांवर लंपी स्कीन डिसीजने आक्रमण केले होते. कोरोनाचे संकट कायम असून त्याचा सर्वच घटकांवर मोठा परिणाम जाणवत आहे.

जनावरांमध्ये आढळणाºया अतिसांसर्गिक आजारांमध्ये लाळखुरकत हा एक महत्त्वाचा आजार आहे. हा आजार विषाणूजन्य आहे. जनावरांचा एकमेकांशी संपर्क आल्यामुळे संसर्गातून हा आजार होतो. या आजाराची लागण एका जनावराकडून अनेक जनावरांना होते. जनावरांना ताप येणे, लाळ गळणे, नाकातून स्त्राव वाहणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. यात रोगप्रतिकारशक्ती होऊन जनावर दगावण्याचीही शक्यता असते. प्रतिबंधाकरिता शासनामार्फत वर्षातून दोनवेळा लसीकरण मोहीम हाती घेतली जाते. गतवर्षी पावसामुळे लसीकरण मोहीम लांबली होती. ती ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करण्यात आली. लसीचा हा कालावधी आता संपत आला आहे. मात्र, जिल्हा पशुसंवर्धन विभागाला शासनाकडून लसीचा पुरवठा झालेला नाही. २०१९ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात एकूण ४ लाख ८९ हजार ८३६ जनावरे आहेत. या गाय-म्हैसवर्गीय आदी सर्वच जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण आला आहे.

लाळखुरकत हा गाई, म्हशी, बैल, वासरे या जनावरांना होणारा संसर्गजन्य आजार असून जिल्ह्यातील १०५ पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत दरवर्षी लसीकरण मोहीम राबविली जाते. आवश्यक साठा शासनाकडून उपलब्ध झाल्यानंतर मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

-डॉ. प्रवीण तिखे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वर्धा.

गाय-म्हैसवर्गीय जनावरांना होणाऱ्या लाळखुरकत या रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पशुधनाच्या संख्येनुसार लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात येते. लससाठा प्राप्त होताच कृषी व पशुसंवर्धन सभापती यांच्या मार्गदर्शनात लसीकरण मोहीम राबविली जाईल.

-डॉ. बी. व्ही. वंजारी, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, वर्धा.

कोणकोणत्या लस दिल्या जातात?

-गाई, म्हशींना मे महिन्यात घटसर्प, फऱ्या, लाळ्या व खुरकतही लस देण्यात येते. मे महिन्यात वर्षातून एकवेळा रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या भागात फाशी ही लस देण्यात येते.

-शेळ्या-मेंढ्यांना घटसर्प, लाळ्या, खुरकत, फऱ्या व काळपुळी ही लस मान्सूनपूर्वी देण्यात येते.

-आंत्रविषार ही लस वर्षातून एकदा एप्रिलमध्ये दिली जाते.

नोव्हेंबर हुकला, आता काय होणार?

कोरोना संसर्गाचा सर्वच योजनांवर मोठा परिणाम झाला आहे. जनावरांच्या लसीकरणावरही या आजाराचे सावट दिसून येत आहे. जिल्ह्यात जनावरांचे लसीकरण नोव्हेंबर आणि मे महिन्यात करण्यात येते. नोव्हेंबरमध्येही लसीकरण उशिरा झाले होते. कोरोनामुळे लससाठा प्राप्त झालेला नसल्याने आता मे महिन्यातील लसीकरणही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

पशुपालक चिंतित....

दरवर्षी मे महिन्यात जनावरांना होणारे लसीकरण अद्याप झालेले नाही. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या कालावधीत जनावरांनाविविध संसर्ग आजारांची लागण होण्याची शक्यता असते. लसीकरणाअभावी रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

-दादाराव वैद्य, सिंदी (मेघे).

मागील वर्षीही जनावरांचे लसीकरण उशिराने झाले. यावर्षी मे महिना सुरू असताना पशुसंवर्धन विभागाला कोरोनामुळे लसींचा पुरवठा झालेला नसल्याने लसीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे. लसीकरण मोहीम राबविण्याची गरज आहे.

-जगदीश घाटोळ, सिंदी (मेघे.

हे करा उपचार...

तोंड आणि पायाचा रोग असलेल्या जनावरांना १ टक्के पोटॅशियम परमॅग्नेट असलेल्या पाण्याने धुवावे. पायाच्या जखमांना अ‍ॅण्टिसेप्टिक लोशन लावावे. बोरिक अ‍ॅसिड व ग्लिसरिनचा लेप तोंडातील फोडांवर लावावा. रोगग्रस्त जनावरांना उपशामक आहार द्यावा, त्यांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवण्यात यावे.

 

Web Title: Vaccination of human beings has stopped, even animals have stopped ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती