12 जागी सहा तर 20 केंद्रांवर तीन दिवस व्हॅक्सिनेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 05:00 AM2021-03-06T05:00:00+5:302021-03-05T23:30:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महालसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पहिल्या फळीतील कोविड योद्धांना तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महालसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पहिल्या फळीतील कोविड योद्धांना तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस दिल्यानंतर आता १ मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांसह ४५ ते ६० वयोगटातील अतिजोखमीच्या व्यक्तींना कोविडची व्हॅक्सिन दिली जात आहे. लसीकरण केंद्रांवरील नागरिकांची गर्दी टाळता यावी तसेच कुठलाही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहू नये या हेतूने जिल्ह्यातील १२ ठिकाणी आठवड्यातून सहा दिवस तर २० केंद्रांवर आठवड्यातून तीन दिवस नागरिकांना कोरोनाची लस नि:शुल्क दिली जाणार आहे. कोविडशी लढा देण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती विकसीत होण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने लसीचे दोन डोज घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
लसीकरण केंद्रांवरही केली जाणार नोंदणी
ज्या लाभार्थ्यांना स्वत: नोंदणी करता आली नाही अशा व्यक्तींना लसीकरण केंद्रावरच नोंदणी करण्याची सूविधा उपलब्ध राहणार आहे. पण त्याकरिता लाभार्थ्याना आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, त्यांना कुठला आजार आहे त्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत ठेवून ते नोंदणी करणाऱ्याला देणे आवश्यक राहणार आहे.
तीन खासगी केंद्रावर मोजावे लागेल लसीसाठी २५० रुपये
केंद्र शासनाच्या सूचनेवरून जिल्ह्यात तीन खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यात सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, आर्वी येथील डॉ. राणे हॉस्पिटल तर हिंगणघाट येथील डॉ. लोढा हॉस्पिटलचा समावेश आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी लस घेऊ इच्छिणाऱ्यांना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीसाठी नाममात्र शुल्क म्हणून २५० रुपये मोजावे लागणार आहे. तर शासकीय लसीकरण केंद्रांवर नि:शुल्क लस दिली जाणार आहे.
लस घेऊ इच्छिणाऱ्यांना सुविधा व्हावी म्हणून लसीकरण केंद्रांवरही नोंदणी करण्याची सूविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असले तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीचा वापर करून घरूनच नोंदणी केल्यास लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होणार नाही. लाभार्थ्यांना देण्यात येणारी लस पूर्णपणे सुरक्षीत असून नागरिकांनीही कुठलही भीती मनात न बाळगता स्वयंस्फूर्तीने शासकीय लसीकरण केंद्रांवर जावून कोरोनाची लस टोचून घ्यावी. शासकीय केंद्रांवर लस नि:शुल्क देण्यात येणार आहे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.