ग्रा़पं़ निवडणुकीचे २००५ पासूनचे मानधन रखडले
By Admin | Published: April 18, 2015 01:50 AM2015-04-18T01:50:55+5:302015-04-18T01:50:55+5:30
ग्रामपंचायत सार्वत्रिक, पोटनिवडणूक कामाकरिता नियुक्त कर्मचाऱ्यांचे २००५ पासूनचे थकित मानधन अद्याप देण्यात आलेले नाही.
समुद्रपूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक, पोटनिवडणूक कामाकरिता नियुक्त कर्मचाऱ्यांचे २००५ पासूनचे थकित मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते त्वरित शिक्षक कर्मचारी यांना देण्याची मागणी होत आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक पोटनिवडणूक मतदानाच्या कामाकरिता जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना प्राधान्याने नियुक्त केले जाते़ काही वेळेस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मतदान अधिकारी म्हणून कर्तव्यावर जावे लागते़ कर्तव्य जबाबदारीने पार पाडलेली असताना जून २००५ पासून पार पडलेले विविध टप्प्यातील निवडणूक कामाचे मानधन आजपर्यंत प्रशासनाने जबाबदारी समजून दिले नाही़
निवडणुकीच्या कामासाठी मूळ मुख्यालयाऐवजी इतरत्र नियुक्त कर्तव्यस्थळी दोन दिवसांच्या दक्षतापूर्वक निवासाने राहावे लागते़ सदर कालावधीतील रहिवास व आवश्यक दोन दिवसांची दैनंदिन गरज लक्षात घेता मानधन मिळणे अत्यंतिक गरजेचे आहे़ त्यामुळे जून २००५ ते एप्रिल २०१५ पर्यंत पार पडलेल्या निवडणूक कामाचे मानधन तसेच लोकसभा २०१४ व विधानसभा २०१४ करिता बी़एल़ओ़ म्हणून नियुक्त कर्मचाऱ्यांचे कामाचे मानधन देण्याची मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिष्टमंडळात प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष संतोष कोडापे, सरचिटणीस दिलीप झाडे, कार्याध्यक्ष बंडू सोनवणे, उपाध्यक्ष नाना आडकीने, कोषाध्यक्ष शिवाजी फुंदे यांच्यासह वामन शेळकी, हेमंत बढीये, गजानन ठोंबरे, जयंत बोचरे, सुशील गायकवाड, सुनील लोंडे, विशाल केदार, विलास भराडे, योगीरात बोरकुटे, योगीराज कोहचाडे, भास्कर कलाम, महाजन, शेडमाके उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)