सेवाग्राम येथून होणार ‘वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ; सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 12:52 PM2022-09-20T12:52:36+5:302022-09-20T13:12:19+5:30
गांधी जयंतीला सुरू होणार अभियान
वर्धा : एकमेकांशी संवादाची सुरुवात करताना हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या अभियानाचा प्रारंभ २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून सेवाग्राम (वर्धा) येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी ही घोषणा केली. या अभियानाला राज्यातील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.
राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्धा येथे आयोजित राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा, तसेच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचा आढावा मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. आ. पंकज भोयर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, आदी या बैठकीस उपस्थित होते.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक राष्ट्रपुरुषांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. २ ऑक्टोबरला होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात राष्ट्रपुरुषांचे स्मरण करण्यात येणार आहे तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या महात्मा गांधी जयंतीला सेवाग्राम येथून राज्य सरकारच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त विविध स्पर्धा, शिबिरे व सांस्कृतिक कार्यक्रमही होतील.