वॉटर कुलरमध्ये अळ्या अन् डास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:02 AM2017-07-30T00:02:42+5:302017-07-30T00:04:04+5:30
जिल्हा परिषदेमध्ये सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांचा राबता असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेमध्ये सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांचा राबता असतो. सर्वांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून आरो सिस्टम बसविण्यात आले; पण वॉटर कुलर नादुरूस्त आहे. परिणामी, वॉटर कुलरच्या पाण्यात अळ्या, डास आणि कचरा असल्याचे जि.प. अध्यक्षांनी शनिवारी केलेल्या पाहणीत उघड झाले. या दुरवस्थेबाबत त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना चांगलेच धारेवर धरले.
जि.प. पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तथा येणाºया नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून लावलेले ‘आरो सिस्टीम’ सुरू-बंद करण्याकरिता कर्मचारी नियुक्त केला; पण हे सिस्टम व्यवस्थित हाताळले जात नसल्याचे पाहणीमध्ये उघड झाले. परिणामी, वॉटर कुलरमध्येही अशुद्ध पाणी येत असल्याचे आढळले. जि.प. इमारतीमध्ये सहा वॉटर कुलर आहेत. यातील तीन नादुरूस्त असून इतरांची दैनावस्था आहे. वॉटर कुलरच्या शेजारी असलेल्या बेसीनही अस्वच्छ होते. सर्व सुविधा असताना नागरिकांना अळ्या आणि डासयुक्त अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. या वॉटर कुलरचे झाकण कुणालाही सहज उघडता येते. हे झाकण उघडून पाहिल्यास अस्वच्छतेचा कळस समोर येतो. जि.प. अध्यक्ष मडावी यांनी आज या केलेल्या पाहणीत बहुतांश वॉटर कुलरमध्ये अळ्या, डास व कचरा आढळून आला. यावरून जिल्हा परिषदच डेंग्यूचा आजार तर पसरवित नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिकाºयांनी झटकली जबाबदारी
जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी पाहणी केल्यानंतर हे काम कुणाकडे आहे, अशी विचारणा करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन बांधकाम विभागाकडे तर तेथील अधिकारी अन्य कुणाकडे बोट दाखवून मोकळे होत असल्याचेही पाहावयास मिळाले. कुणीही जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शुद्ध पाणी पुरविणे व स्वच्छता राखण्याचे काम करतो तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता. टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्याने जि.प. अध्यक्षांनी विकतचे पाणी बंद करण्याचे निर्देश दिले. आरो सिस्टीम व्यवस्थित हाताळत स्वच्छतेच्या कामांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही संबंधित अधिकाºयांना दिलेत.
देखभाल दुरूस्तीवर १२ लाखांचा खर्च
जिल्हा परिषद इमारतीच्या देखभाल, दुरूस्ती आणि स्वच्छतेवर वर्षाकाठी १२ लाख रुपयांचा खर्च केला जातो. असे असताना जि.प. परिसरात स्वच्छतेचा वाभाडे निघाल्याचे दिसते. वॉटर कुलर, स्वच्छतागृह, शौचालयाची पुरती दुरवस्था झाली आहे. कुठे टाईल्स फुटल्या तर कुठे दारेच नाही. एका स्वच्छतागृहाची पाहणी करताना अध्यक्षाने ‘येथे तर शनिशिंगणापूर शहरात गेल्यागत स्थिती आहे’, असेही उपहासात्मक संबोधले. त्यातील शौचालयांना दारेच नसल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे अधिकारी, कर्मचाºयांची गोची होत नाही का, अशी विचारणाही त्यांनी कर्मचाºयांना केली. पाणी तथा स्वच्छतेची पाहणी केल्यानंतर जि.प. अध्यक्ष मडावी यांनी संबंधित अधिकाºयांना धारेवर धरत कामे व्यवस्थित होत नसतील आणि कुणाचे नियंत्रण राहत नसेल तर एक पैसाही खर्च करण्यास दिला जाणार नाही, असा दमही दिला. अध्यक्षांनी केलेल्या या आकस्मिक पाहणीमुळे अधिकारी, कर्मचाºयांमध्येही धास्ती निर्माण झाली होती.
स्वच्छतागृहाचे काम अपूर्णच
मागील काही वर्षांत जि.प. पाणी पुरवठा विभागालगत असलेल्या स्वच्छतागृहाची समस्या निर्माण झाली होती. येथील सांडपाणी थेट खालच्या माळ्यावरील एका कार्यालयात जात होते. यामुळे ते स्वच्छतागृह बंद करून काम प्रस्तावित करण्यात आले. दोन-तीन वर्षे लोटली असताना ते काम अद्यापही करण्यात आले नाही. कामाच्या नावावर स्वच्छतागृह मात्र कुलूप बंद करून ठेवण्यात आले आहे. यामुळे येथील अधिकारी, कर्मचाºयांना अन्यत्र जावे लागते.
आरो सिस्टीम असताना विकतचे पाणी
जिल्हा परिषद इमारतीच्या छतावर शुद्ध पाण्याकरिता आरो सिस्टीम तर प्रत्येक माळ्यावर दोन वॉटर कुलर लावण्यात आले आहे. सर्वांना शुद्ध व थंड पाणी मिळावे हा उद्देश होता. या व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने कुलरमध्ये अशुद्ध पाणी असते. परिणामी, प्रत्येक विभागात विकतच्या पाण्याच्या कॅन बोलविल्या जातात. किमान ६० कॅन जिल्हा परिषदेमध्ये येत असून यावर वर्षाकाठी एक लाख रुपयांचा खर्च होतो. आॅरो सिस्टीम असताना हा खर्च अनाठायीच ठरत आहे.
आरो सिस्टीम असताना अशुद्ध पाणी येत होते. यामुळे आज पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला. शिवाय विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याचे दिसून आले. यामुळे विकतचे पाणी बंद करण्याचे निर्देश दिलेत. जि.प. इमारतीमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासह स्वच्छता राखण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.
नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वर्धा.