काय मावशी... ताप आहे काय... रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

By महेश सायखेडे | Published: October 6, 2023 07:03 PM2023-10-06T19:03:02+5:302023-10-06T19:03:02+5:30

यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी करून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

vardha Dist Collector interacted with patients | काय मावशी... ताप आहे काय... रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

काय मावशी... ताप आहे काय... रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

googlenewsNext

वर्धा : काय मावशी... काय झाले... ताप आहे काय... रक्त तपासले काय अशी भावनिक साद घालत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुक्रवारी जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या येळाकेळी येथील उषा खंगार या महिला रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी करून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू तांडव करीत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून विविध विभागाची पाहणी केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सुरूवातीला ट्रामा केअर युनिटची पाहणी केली. या विभागात महत्त्वाची ठरणारी सीआप मशीन नादुस्त असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगताच जिल्हाधिकाऱ्यांनीही संबंधित मशीन तातडीने खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या.

त्यावर आयुक्तांकडे त्यासंदर्भाने पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने संबंधित मशीन रुग्णालयात कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिदक्षता विभागात जात तेथील सोई-सुविधांची पाहणी केली. शिवाय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागात जात तेथील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया विभाग, औषध वितरण केंद्र आदीला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत कार्यरत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखेडे आदींची उपस्थिती होती.

औषधसाठ्या विषयी केली विचारणा
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अस्थिरोग विभाग व ट्रामा केअर युनिटची पाहणी केल्यावर थेट औषधी वितरण केंद्र गाठले. तेथे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या रांगेत उभे राहून औषधांचे वितरण करणाऱ्यांना औषधसाठा आहे काय असे म्हणत उपलब्ध औषधसाठ्याबाबत विचारणा केली. इतकेच नव्हे तर औषध घेत असलेल्या काही रुग्णांशी संवाद साधला.

डॉ. गाठे यांनी दिली एसएनसीयूची माहिती
बालरोग विभाग आणि एसएनसीयूचे प्रमुख डॉ. संजय गाठे यांनी एसएनसीयूतील सोई-सुविधांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना एसएनसीयूमध्ये दाखल असलेल्या नवजात बालके, रेफरीन आणि रेफर आऊट नवजात बालकांविषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याच ठिकाणी स्वत:च्या कुटुंबाला दुय्यम स्थान देत रुग्ण सेवा देणाऱ्या चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

स्वच्छते बाबत व्यक्त केले समाधान
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केल्यावर जिल्हा रुग्णालयाला भेट देण्याच्या कारण स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन आज आपण जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून येथील आरोग्य सेवेची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाने सर्वांनाच मोफत आरोग्य सेवा केल्याने १५ ऑगस्टपासून रुग्णालयातील ओपीडी संख्येत वाढ झाली आहे. वाढती रुग्ण संख्या आणि उपलब्ध औषधसाठा याबाबतचीही माहिती आपण आज जाणून घेतली. शिवाय रुग्णांना उत्तम शासकीय आरोग्य सेवा मिळतेय काय याची रुग्णांशी संवाद साधून शहानिशा केली. जिल्हा रुग्णालयात मुबलक औषधसाठा आहे.- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.

Web Title: vardha Dist Collector interacted with patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.