वर्धेकरांनी साजरी केली आगळीवेगळी वटपौर्णिमा; सावित्रीच्या लेकींचा सन्मान करीत वटवृक्षारोपण
By अभिनय खोपडे | Published: June 3, 2023 06:15 PM2023-06-03T18:15:49+5:302023-06-03T18:17:11+5:30
यावेळी पुनर्जन्म नाकारत याच जन्मात समाजहिताची कामे करीत उत्तम आयुष्य जगावे, असा संदेशही देण्यात आला.
वर्धा : पतीच्या दीर्घायुरारोग्याची कामना करीत जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना वटवृक्षाला फेऱ्या मारीत आणि सूत्र गुंडाळीत वटसावित्रीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र, या परंपरेतील विषमतेला फाटा देत स्त्रीपुरुष समानतेचा व वृक्षारोपणाचा संदेश देणारी आगळीवेगळी वटपौर्णिमा वर्धेकरांनी साजरी केली.
स्थानिक निसर्ग सेवा समिती परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी विविध जोडपी वटपौर्णिमेच्या सकाळी एकत्र आली. स्त्रियांनीच आपल्या नवऱ्यासाठी व्रतवैकल्ये करावीत, त्यांच्या पाया पडावे, दीर्घायु लाभण्यासाठी उपवास करावा, या असमानता रुजविणाऱ्या परंपरेला नाकारत या जोडप्यातील पुरुषांनी पत्नीचे पूजन केले, वृक्षरोप देऊन तिचे स्वागत केले. इतकेच नव्हे तर पत्नीच्या चक्क पाया पडत तिच्या दीर्घायुष्याची कामनाही याप्रसंगी पतिराजांनी केली. यावेळी पुनर्जन्म नाकारत याच जन्मात समाजहिताची कामे करीत उत्तम आयुष्य जगावे, असा संदेशही देण्यात आला. या सर्व जोडप्यांनी मिळून परिसरात वड व अन्य वृक्षांची रोपटी लावली आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत प्रदक्षिणाही घातली.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमात डॉ. शोभा व मुरलीधर बेलखोडे, सुरेखा व भाऊ थुटे, प्रा. वनिता व प्रशांत देशमुख, संगीता व संजय इंगळे तिगावकर, शोभा व दामोदर राऊत, संजीवनी व दत्तात्रय कानसकर, वनिता व बाबाराव भोयर, डॉ. मेघा व सुहास लांडगे, वर्षा व प्रफुल्ल लिंगावार, विद्या व प्रमोद भोयर, वैष्णवी व स्वप्नील देशमुख, जयश्री व दिलीप वाकडे, मनीषा व विजय भगत, शीतल व निलेश बाभळे, शीतल व अनुप खडसे, विजयश्री राजेंद्र साळुंखे, यशवंत नलोडे, कृष्णा आखरे, डॉ. अनिल लोणारे, राजकुमार वासेकर, राजेंद्र घोडमारे, अरविंद मेश्राम, बाबाराव सावरकर, अनिल देवतळे, प्रफुल्ल द्रव्यकर, श्रीराम नौकरकर, जनार्दन खोत, गौतम फुलमाळी, नितीन डगवार, विजय भगत, देवीप्रसाद उपाध्याय, रमेश बेद, बाळकृष्ण पडवे, अजय तिगावकर, वसंत बाभूळकर, अमित शिंदे, राधिका भोयर, संजीव शेळके आदी सहभागी झाले होते. यावेळी, वृक्षारोपण करून इहा देशमुख या विद्यार्थिनीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.