बचत गटांच्या उत्पादन विक्रीकरिता वर्धिनी महोत्सव
By admin | Published: March 17, 2017 02:01 AM2017-03-17T02:01:37+5:302017-03-17T02:01:37+5:30
स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना व राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता बचत गटांनी
स्मिता माहुरकर यांचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट रेन्बो कार्यक्रम : सूरसंगम मराठी, हिंदी गाण्याची मेजवानी
वर्धा : स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना व राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तु व कलाकृती तथा ग्रामीण खाद्य पदार्थाची जिल्हास्तरीय प्रदर्शनी व विक्रीकरिता वर्धिनी महोत्सवाचे अयोजन करण्यात आले आहे. येथील जुना आरटीओ मैदानावर १७ ते २० मार्च या कालावधीत हा महोत्सव आहे.
महोत्सवाचे उद्घाटन १७ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस राहणार आहे. तर आ. डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, रणजित कांबळे, अमर काळे, नागो गाणार, अनिल सोले यांच्यासह जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे, सभापती वसंता पाचोडे, सभापती चेतना मानमोडे, श्यामलता अग्रवाल, वसंत आंबटकर यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसहायता बचत गट हे एक प्रभावी माध्यम आहे. जिल्ह्यात स्वयंसहायता गटाची उत्कृष्ट पायाभरणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत करण्यात आली आहे. तसेच या गटांना निरनिराळे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येऊन महिलांच्या शाश्वत उपजिविकेकडे लक्ष देण्यात येते व यातूनच स्वयंसहायता गट स्वत:च्या वस्तु उत्पादीत करतात. या उत्पादित केलेल्या मालाची प्रदर्शनी विक्री करून बचत गट सक्षम होण्यासाठी वर्धिनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कलाकृती व विविध खाद्य पदार्थाचा आनंद घेता येईल. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता सुरभी ठोमणे प्रस्तुत सुरसंगम हा मराठी, हिंदी गितांचा कार्यक्रम, १८ मार्चला सायंकाळी कला अर्पण मंच प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा व १९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता नात्याचे रंग उलगडणारा, लेखिका व अभिनेत्री डॉ. स्मिता माहुरकर प्रस्तुत ब्लॅक अॅण्ड व्हाईट रेन्बो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला वर्धेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार यांनी केले आहे.(प्रतिनिधी)