सावंगी पेट्रोल पंपावर साठ्यात तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:40 PM2018-03-05T23:40:26+5:302018-03-05T23:40:26+5:30
शहरातील पेट्रोल पंपावर होत असलेल्या गडबडीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त आहेत. यातच इथेनॉलच्या प्रमाणाबाबत जनजागृती करणे गरजेचे असताना एकाही पंपावर तसे होत नाही.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : शहरातील पेट्रोल पंपावर होत असलेल्या गडबडीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त आहेत. यातच इथेनॉलच्या प्रमाणाबाबत जनजागृती करणे गरजेचे असताना एकाही पंपावर तसे होत नाही. यामुळे जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने नागपूर येथील एचपीसीएल मोबाईल लॅबच्या प्रबंधकाच्या उपस्थितीत सोमवारी शहरातील पंपांची तपासणी करण्यात आली. यात सावंगी (मेघे) येथे पेट्रोल आणि डिझेलच्या साठ्याबाबत मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आली. यावरून येथे पेट्रोल व डिझेल विक्री करताना आकड्यांचा खेळ तर होत नाही ना, अशी शंका तपासणी करणाºया पथकाकडून व्यक्त करण्यात आली.
पेट्रोमध्ये इथेनॉलचे प्रमाण असते हे सर्वसामान्यांना माहिती आहे; पण त्याचे प्रमाण किती असावे आणि त्यावर वातावरणाचा काय परिणाम होतो, याची जनजागृती करण्याची जबाबदारी पेट्रोल पंप चालकांची आहे. वर्धेत मात्र तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात पंप असणाºया कंपन्यांकडून देण्यात आलेले फलक लावणे अनिवार्य असताना वर्धेतील एकाही पंपावर तसे दिसून आले नाही. यामुळे बरेच नागरिक या इथेनॉलच्या प्रमाणाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते. याचीच तपासणी या पथकाकडून करण्यात आज आली.
वर्धेतील पंपाची तपासणी करण्याकरिता हे पथक तीन दिवस शहरात आहे. पथकाने तपासणी मोहिमेचा शुभारंभ नागपूर मार्गावरील एम.एच. राजपाल या पेट्रोल पंपापासून केला. येथे तपासणी करून हे पथक आर्वी मार्गावरील आशीर्वाद पेट्रोल पंपावर पोहोचले. येथील पेट्रोलचे नमूने घेऊन ही चमू सावंगी (मेघे) परिसरातील यवतमाळ मार्गावर असलेल्या पंपावर पोहोचली. येथे पेट्रोलचे नमुने घेताना पंपावर असलेल्या साठ्याबाबत मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे दिसून आले. येथे आलेला साठा, झालेली विक्री आणि शिल्लक असलेला साठा यात मोठ्या प्रमाणात तफावत होती. यामुळे तपासणी चमुने येथील सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून सायंकाळपर्यंत ही चमू याच पंपावर असल्याचे दिसून आहे.
येथील पंपाच्या तपासणीअंती इतर पंपांचीही तपासणी करण्यात येणार आहे. पंपाचा हा तपासणी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे सोपविण्यात येणार असल्याचे तपासणी चमूतील अधिकाºयांनी सांगितले. यामुळे मिळून आलेल्या तफावतीवर होणाºया कार्यवाहीचा निर्णय जिल्हा पुरवठा अधिकारी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या पथकात नागपूर येथील विनोद तायडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी यु.एम. तोडसाम, एम.एन. मांडवगडे, ए.डी. कातकडे, एस.यु. चौधरी यांचा समावेश आहे.
इतर सुविधांचीही तपासणी
पंपावर आवश्यक असलेल्या इतर सुविधांचीही यावेळी तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवालही तयार करण्यात येत आहे. वर्धेत असलेल्या पंपांची तपासणी करताना येथे आवश्यक असलेल्या सुविधांची वाणवाच असल्याचे दिसून आल्याच्या प्रतिक्रीया तपासणी पथकातील अधिकाºयांनी दिल्या आहेत.
इथेनॉलच्या प्रमाणाबाबत जनजागृती आवश्यक
वाहनात भरल्या जाणार असलेल्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे; पण त्याच्या प्रमाणात फरक पडल्यास त्याचा परिणाम नागरिकांच्या वाहनावर होतो. यामुळे याबाबत जनजागृती आवश्यक आहे. तसे फलक पंपावर लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
शहरात तपासणी मोहिमेत सोमवारी तीन पंपांची तपासणी करण्यात आली. यात सावंगी पंपावर साठ्याबाबत जरा गडबड असल्याचे दिसून आले. इतर पंपावरून शासनाच्या सूचनेनुसार इथेनॉलचे नमुने घेणे सुरू आहे. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल. कार्यवाही संदर्भात तेच निर्णय घेतील. ही तपासणी तीन दिवस राहणार आहे.
- यु.एम. तोडसाम, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.