वरुणराजाची दिवसभर संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 05:00 AM2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:00:12+5:30
मागील २४ तासात वर्धा तालुक्यात ११.४८ मिमी, सेलू ११.४० मिमी, देवळी १४.२३ मिमी, हिंगणघाट ५.७८ मिमी, समुद्रपूर ७.४१ मिमी, आर्वी २२.७८ मिमी, आष्टी ६९.२० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३३.५८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी १७ ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात मध्यम पाऊसासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील २४ तासांत जिल्ह्यातील आठही तालुक्यात संततधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोट्या आणि मोठ्या तसेच मध्यम जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. शिवाय काही जलाशयातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील २४ तासात वर्धा तालुक्यात ११.४८ मिमी, सेलू ११.४० मिमी, देवळी १४.२३ मिमी, हिंगणघाट ५.७८ मिमी, समुद्रपूर ७.४१ मिमी, आर्वी २२.७८ मिमी, आष्टी ६९.२० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३३.५८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी १७ ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात मध्यम पाऊसासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. एकूणच मागील २४ तासांत झालेला पाऊस उभ्या पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे. शिवाय शेतकरीही सुखावला आहे.
महाकाळीचा धाम झाला फुल्ल
खरांगणा (मो.) : नजीकच्या महाकाळी येथील धाम प्रकल्प सततच्या पावसामुळे १०० टक्के भरला आहे. सध्या सांडव्यावरून पाणी वाहत असून खबरदारीचा उपाय म्हणून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धाम नदी पात्रातील पाणी साठा वाढल्याने काचनूर, कासारखेडा, खरांगणा, मोरांगणा या गावात दवंडी देऊन नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.
सेवाग्रामात जनजीवन विस्कळीत
सेवाग्राम : शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सततचा पाऊस सुरू राहिल्याने चाकरमानी वगळता अन्य नागरिकांना घरातच थांबावे लागले होते. शिवाय बाजारपेठ बंद राहिल्याने रस्तेही निर्मनुष्य होते.
कारंजाचा खैरी प्रकल्प भरला १०० टक्के
कारंजा (घा.) : तालुक्यातील खैरी प्रकल्प सततच्या पावसामुळे सध्या १०० टक्के भरला आहे. शिवाय या प्रकल्पाच्या शेजारील गावांना खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दमदार पाऊस झाल्याने या भागातील शेतकरी सुखाबला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
१०० वर्षे जुने झाड कोसळले
हिंगणघाट : शुक्रवारी संततधार पावसादरम्यान स्थानिक गांधी वॉर्ड येथील अॅक्सिस बँक चौकातील १०० वर्षे जुने कडूनिंबाचे डेरेदार वृक्ष कोसळले. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली असून सुदैवाने कुठलीही जीवितहाणी झाली नाही. मात्र, प्रा. संदीप रेवतकर यांच्या घराचे काही प्रमाणात नुकसान झाले. या भागात रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. परंतु, काम कासवगतीने सुरू असतानाच ही घटना घडली. या भागातील रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची मागणी आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
निम्न वर्धा धरणाचे १५ दरवाजे उघडले
देऊरवाडा/ आर्वी : आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा जलाशय ७४ .८१ टक्के भरला असून या धरणाचे ३३ पैकी १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून ६०२ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सूरू आहे. निम्न वर्धा जलयाशातील पाणी वर्धा नदीत सोडले जात असल्याने या नदी काठावरील धनोडी बहादरपूर, वडगाव पांडे, दिघी (हो.), सायखेडा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.