कुलगुरु शुक्ल यांच्यासह महिलेने घेतले होते मच्छर मारण्याचे द्रव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 10:26 AM2023-08-10T10:26:51+5:302023-08-10T10:29:47+5:30
दीड महिन्यांपासून सदर घटना दडपून ठेवण्यासाठी विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंनी मोठी फ्लिडिंग लावल्याची चर्चा
वर्धा : मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर आपत्तीजनक चाटिंगसह विविध कारणांवरून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ चर्चेत राहिले आहे. या दरम्यान एका महिलेच्या प्रकरणावरून विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्राे. रजनीशकुमार शुक्ल व अन्य एका महिलेने एकाचवेळी गुडनाईट हे मच्छर मारण्याचे विषारी द्रव्य प्राशन केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. याला रुग्णालय प्रशासनासह पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.
दीड महिन्यांपासून सदर घटना दडपून ठेवण्यासाठी विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंनी मोठी फ्लिडिंग लावल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. हिंदी विश्वविद्यालयात जुलै महिन्यात राष्ट्रपतींचा दौरा होणार होता. मात्र, २६ जून रोजी रात्रीच्या सुमारास कुलगुरु रजनीशकुमार शुक्ल व एका महिलेला सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये ओपीडी क्रमांक २३०६२७००१३ वर रजनीश शुक्ला (रा. हिंदी विश्वविद्यालय) आणि ओपीडी क्रमांक २३०६२७००१३ वर एका महिला रुग्णाचे नाव पत्ता हिंदी विद्यालय, असे नोंदविले गेले आहे. यासंदर्भात लोकमतने रुग्णालय तसेच पोलिस ठाणे गाठून या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता सावंगी पोलिसांनी व रुग्णालयानेही याला दुजोरा दिला.
२६ जून रोजी रात्रीच्या सुमारास कुलगुरु रजनीशकुमार शुक्ल सावंगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते. मात्र, ते कोणत्या कारणास्तव भरती झाले होते याची माहिती नाही. यासाठी रुग्णालयातील रेकॉर्डमधील डिस्चार्ज पेपर तपासावे लागेल.
राजेश सव्वालाखे, व्यवस्थापन अधिकारी, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे.
२६ जून रोजी कुलगुरु रजनीशकुमार शुक्ल यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांना भरती केल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली होती. त्यांची एमएलसी प्राप्त झाली होती. बयाण नोंदविण्यासाठी पोलिस कर्मचारीही पाठविले होते; पण ते तेथून डिस्चार्ज घेऊन रुग्णालयातून निघून गेले होते. घटनास्थळ रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने एमएलसी अहवाल आम्ही रामनगर पोलिसांना पाठविला आहे.
- धनाजी जळक, पोलिस निरीक्षक, सावंगी.
रामनगर पोलिस ठाण्यात २७ जून रोजी दुपारी ४ वाजून ५५ मिनिटांनी रजनीश शुक्ल आणि एका महिलेने विषारी द्रव्य प्राशन केल्याची नोंद घेतली होती. याची माहिती आम्हाला सावंगी पोलिसांकडून प्राप्त झाली होती. तशी नोंदही रजिस्टर बुकात आहे.
- राजू राऊत, पोलिस नायक, स्टेशन डायरी इन्चार्ज, रामनगर.
२६ जून रोजी कुलगुरु प्राे. रजनीशकुमार शुक्ल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती नेमकी कशाने बिघडली याबाबतची माहिती मला नाही.
- बी. एस. मिरगे, जनसंपर्क अधिकारी, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ.