'त्या' बाप-लेकाला चिरडणारे वाहन पोलिसाच्या मुलाचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 05:24 PM2021-12-27T17:24:00+5:302021-12-27T17:26:40+5:30
शनिवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीने शेतातून घरी परत येत असलेल्या बाप-लेकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देत घटनास्थळावरून पळ काढला. यात बाप-लेकाचा मृत्यू झाला होता पोलिसांनी त्या आरोपीला शोधून काढले आहे.
वर्धा : शेतातून घरी दुचाकीने परत जात असलेल्या रोहणा येथील विजय गाणार व अविष गाणार या बाप-लेकाला भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने रोहणा-पिंपळखुटा मार्गावर चिरडून ठार केले. या प्रकरणातील आरोपी वाहन चालकाला हुडकून काढण्यात पुलगाव पोलिसांना यश आले असून आरोपी वाहन चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे असल्याचे पुढे आले आहे.
रोहणा येथील विजय गाणार व अविष गाणार हे दोघे शेतातील मिरचीचा तोडा करून दुचाकीने घरी परत जात होते. दरम्यान भरधाव असलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात विजय व अविष या दोघांचा मृत्यू झाला. ज्या परिसरात हा अपघात झाला त्याच परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरात अपघाताची संपूर्ण घटना कैद झाली. याच सीसीटीव्ही चित्रीकरणातून मिळालेल्या सुगाव्यावरून पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवीत आरोपी वाहनास हुडकून काढले आहे.
विजय व अविष या दोघांना चिरडणारे वाहन आर्वी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून असलेल्या प्रभाकर वाढवे यांचा मुलगा आकाश वाढवे यांच्या मालकीचे आहे. या प्रकरणातील आरोपी वाहनाला पुलगाव पोलिसांनी देवळीनजीकच्या इसापूर येथून ताब्यात घतले आहे. शिवाय वाहन चालक व मालकालाही ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी वाहन जात होते चोरांबाच्या दिशेने
आरोपी वाहन पाेलीस कर्मचाऱ्याच्या मुलाच्या मालकीचे असल्याचे आता पुढे आले आहे. घटनेच्या सायंकाळी दिवशी हे वाहन वासुदेव उईके हा चालवित होता. तो आकाशला सोबत घेऊन प्रभाकर वाढवे यांची सारसवाडी असलेल्या चोरांबा येथे वाहन नेत असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. पुढील तपास पुलगावचे ठाणेदार शेळके यांच्या मार्गदर्शनात जमादार लीलाधर उकंडे, सुधीर गुळकरी करीत आहेत.