वर्धा जिल्ह्यात भरधाव वाहन उलटले; एक ठार, दहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 04:19 PM2019-11-23T16:19:53+5:302019-11-23T16:20:16+5:30
वर्धा-आर्णी मार्गावर भरधाव वेगाने जाणारे चारचाकी वाहन उलटून एक जण ठार तर दहाजण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: वर्धा-आर्णी मार्गावर भरधाव वेगाने जाणारे चारचाकी वाहन उलटून एक जण ठार तर दहाजण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.
चांदणी फाटा परिसरातून जात असलेल्या एम.एच. १९, ए.पी. ०८७४ ही कार खरांगणाच्या दिशेने येत होती. हे वाहन चाणकी शिवारात आले तेव्हा अचानक वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ही गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात, मौसिन खान कसीम खान (२४), मयुर अशोक पेठे (२८), शूभम रमेश वानखेडे (२४), विजय मनोहर निस्ताने (४५), अक्षय प्रकाश चुडे (२७), स्वप्नील अंबादास खांदे (२७), सुनील कन्हैय्यालाल टेहवार (४०) सर्व रा. अमरावती, वृषभ रमेश खोडस्कर (२२) रा. रोशनखेडा वरुड, अमोल गोवर्धन तेलंग (२८) रा. आष्टी, दिलीप भास्कर राऊत (४०) रा नेरसोपाल जि. यवतमाळ हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना अपघातग्रस्त वाहनाच्या बाहेर काढले. दरम्यान खरांगणा पोलीस व रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली. पोलिसी वाहन आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मयुर पेठे याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गजानन गायकी, राजेश शेंडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.